बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. पक्षश्रेष्ठींनी सूचना केल्यास ही पोटनिवडणूक लढविणे अनिवार्य आहे.
उमेदवारांची चाचपणी करून श्रेष्ठींकडे तीन नावांची शिफारस करण्यात आली आहे. आता अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल, अशी माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली.
राजनहळ्ळी (हरिहर) येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, यमकनमर्डी मतदार संघातील प्रत्येक कार्यक्रमात सतीश जारकीहोळी यांचा मुलगा राहुल आणि मुलगी प्रियांका सक्रिय झाले आहेत. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आमदार सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नांवाप्रमाणे आपल्या मुलांची नावे ठेवली आहेत. प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सक्रिय असलेला राहुल राजकीय क्षेत्रात आपल्या वडिलांच्यावतीने फलंदाजी करताना दिसत आहे.
सतीश शुगर्सच्या संचालिका आणि सतीश जारकीहोळी यांच्या कन्या प्रियांका जारकीहोळी यांनी वडिलांच्या मार्गदर्शनानुसार माझी व माझा भाऊ राहुलची राजकीय क्षेत्रात वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.
वडिलांवरील कामाची जबाबदारी, त्यांचा व्याप थोडा कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही दोघेही कांही प्रमाणात राजकारणात सक्रिय झालो आहोत. पुढे वडिलांची इच्छा आणि सूचनेनुसार संपूर्ण वेळ राजकारणाला वाहून घेणार असल्याचेही प्रियांका जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.