गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित दुर्लक्षित अशा सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाल्याकडे मनपा व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन या नाल्यांची साफसफाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथील नाल्याकडे गेल्या अनेक वर्षापासून साफ दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी सांडपाणी तुंबून दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात वारंवार अर्ज विनंत्या करण्याबरोबरच वृत्तपत्रातून आवाज उठवून देखील महापालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर नाल्यामध्ये नेहरूनगर येथील गटारीचे पाणी सोडले जाते. नाल्याची साफसफाई होत नसल्यामुळे सांडपाणी तुंबून आसपासच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरण्याबरोबरच डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. यामुळे आसपास वास्तव्यास असणाऱ्या नागरिक विशेषकरून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
तरी बेळगावला स्मार्ट सिटी करणाऱ्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर नाल्याची तात्काळ साफसफाई करून विकास साधावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.