बेळगावमधील शिवशक्ती गुरुकुल आर्मी कोचिंग सेंटर येथे प्रशिक्षण घेणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केली होती. आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा खून करण्यात आला आहे, असा आरोप मृत युवकाच्या कुटुंबीयांनी केला असून यासंदर्भात कुटुंबियांनी बँड वाजवत कोचिंग सेंटर समोर धरणे आंदोलन छेडले.
आपल्या मुलाच्या आत्महत्येबाबत पोलीस चौकशी व्हावी, आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी मृत युवकाच्या कुटुंबियांनी धरणे धरत न्याय न मिळाल्यास आपणही विष पिऊन जीव देण्याचा इशारा देत कोचिंग सेंटर समोर धरणे आंदोलन छेडले. 12 जानेवारी रोजी सह्याद्री नगर येथील काटा ग्राउंडनजीक असलेल्या शिवशक्ती गुरुकुल अकादमीच्या आर्मी कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या रोहित रमेश तळवार या युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून आपला मुलगा आत्महत्या करु शकत नाही, त्याचा खून करण्यात आला आहे. असा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात रोहितच्या पालकांनी तक्रार नोंदविली. आपल्याला न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकार्यांनाही निवेदन देण्यात आले. अद्याप न्याय मिळाला नसल्याने रोहितच्या कुटुंबियांनी कोचिंग सेंटर समोर बँड वाजवून धरणे आंदोलन छेडले.
रोहितवर जातीय अत्याचार करण्यात आला आणि यातूनच मानसिक खच्चीकरण होऊन त्याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणात सामील असलेल्यांवर कलम ३०२ अन्वये ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, आणि कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे नेते श्रीकांत तळवार यांनी केली आहे.
कोचिंग सेंटरच्या संचालकांनी मृत रोहितच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असे सांगितले असून रोहितच्या कुटुंबियांनी केलेले आरोप खरे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्यावर कोणतेही जातीय अत्याचार करण्यात आले नाहीत. त्याने कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली आहे, हे आपल्यालाही माहीत नाही, असे कोचिंग सेंटरचे संचालक उमाकांत पाटील यांनी स्पष्ट केले.