बेळगावमधील जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ‘नेमेचि येतो, मग पावसाळा’ याप्रमाणे एक रास्ता पूर्ण झाला कि दुसऱ्या रस्त्यावर खोदकाम करण्यात येते. काहीठिकाणी रस्ताच बेपत्ता झाला आहे.
तालुक्यातील मण्णूर – गोजगा रस्त्याची अवस्थाही अशीच झाली आहे. रस्ता आहे की पायवाट आहे याचा संभ्रम निर्माण होतो. गेल्या आठ महिन्यांपासून या रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याला या रस्त्याचा पूर्णत्वासाठी निवेदनदेखील देण्यात आले आहे. परंतु कोणत्याही प्रकारची हालचाल या रस्त्यासाठी अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कंत्राटदाराला आणि रस्ता मंजूर करणाऱ्या आमदारांना यासाठी भरघोस बक्षीस जाहीर करण्याची मिश्किल प्रतिक्रिया आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
गेल्या दोन वर्षात मार्कंडेय नदीला आलेल्या पुरामुळे हा रास्ता पूर्णपणे उखडला आहे. वारंवार मागणी करण्यात आल्यानंतर या रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात झाली खरी! मात्र अद्याप ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही. या मार्गावरील वाहनांची वर्दळदेखील आता वाढली असून अर्धवट राहिलेल्या रस्ते कामकाजामुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. काहीवेळा या रस्त्याचाच शोध घेत वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे.
या रस्त्याचे कामकाज अर्धवट स्थितीत राहिल्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून ती आजूबाजूच्या शेतपरिसरात उडत आहे. त्यामुळे पिकांचेही नुकसान होत आहे. या रस्त्याचे कामकाज लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा रास्त रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.