सामाजिक कार्यकर्ते वीरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जमा केलेल्या सार्वजनिक ठिकाणी तसेच नदीकाठी झाडांखाली ठेवलेल्या देव -देवतांच्या प्रतिमांचे होनगा येथील मार्कंडेय नदीच्या काठावर विधिवत दहन करण्याचा कार्यक्रम आज सकाळी पार पडला.
हुक्केरीचे श्री श्री चंद्रशेखर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना श्री चंद्रशेखर स्वामीजींनी घरातील देव-देवतांच्या तडा गेलेल्या अथवा अतिरिक्त झालेल्या प्रतिमा सार्वजनिक ठिकाणी तसेच नदीकाठी झाडाखाली ठेवण्याची प्रथा अत्यंत चुकीची असून ती बंद झाली पाहिजे.
देव-देवतांच्या मूर्तींप्रमाणे अशा प्रतिमांचे देखील योग्य पद्धतीने विसर्जन झाले पाहिजे, असे मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. यावेळी वीरेश हिरेमठ यांनी समयोचित विचार व्यक्त करताना नागरिकांनी देवदेवतांचे फोटो सार्वजनिक ठिकाणी झाडाखाली वगैरे टाकून देऊ नयेत.
घरातील देव देवतांचे तडा गेलेल्या किंवा अतिरिक्त झालेल्या फोटोंचे काय करायचे असा प्रश्न पडत असल्यास संबंधितांनी जनसेवा फौंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील हिरेमठ यांनी केले.
होनगा येथील मार्कंडेय नदीच्या काठी पूजन करून तसेच श्रीफळ वाढवून विविध ठिकाणाहून गोळा करण्यात आलेल्या देवदेवतांच्या प्रतिमांचे अर्थात फोटोंचे मंत्रोच्चारात दहन करण्यात आले. याप्रसंगी यल्लोजी पाटील, नागेश देसाई आदींसह जनसेवा फाउंडेशनचे अन्य सदस्य उपस्थित होते.