ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यात होत असलेल्या सततच्या शाब्दिक युद्धामध्ये पुन्हा रमेश जारकीहोळींनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांना आता बसस्थानकावर शोधायला हवे असे विधान प्रसारमाध्यमांसमोर आज व्यक्त केले आहे. चिकोडी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही वादग्रस्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून पुन्हा एकदा लक्ष्मी हेब्बाळकर यांचे ‘माईंड आउट’ झाल्याच्या वातव्यावर त्यांनी दबाव टाकला आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील त्यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात टिप्पणी केली होती. लक्ष्मी हेब्बाळकर या गोकाक मध्ये निवडणूक लढविणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. ‘मोस्ट वेलकम’ अशा शब्दात टोलेबाजी करत आता चक्क त्यांना बसस्थानकावर शोधायची वेळ आली असून त्यांचे माईंड आउट झाल्याचे विधान चिकोडी येथे प्रसारमाध्यमांसमोर केले आहे.
जारकीहोळींनी एका कार्यक्रमात आपण काँग्रेस आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. शिवाय दिवसातून दोनवेळा आपण काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांशी संभाषण करतो असेही ते बोलले होते. त्यानंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अद्याप जारकीहोळी भाजपमध्ये रुळले नसल्याची टीका केली. पुन्हा या टीकेला प्रत्त्युत्तर देण्यासाठी जारकीहोळींनी हेब्बाळकरांना टोला लगावला आहे. शिवाय प्रसारमाध्यमांना काँग्रेस व्यतीरिक्त कोणत्याही विषयावर बोला, असा सल्लाही दिला.
जारकीहोळी व्हर्सेस हेब्बाळकर हे द्वंद्व युद्ध गेल्या दोन अडीज वर्षांपासून सुरु आहे. टीका आणि टिप्पणी करणाऱ्या हेब्बाळकर आणि जारकीहोळी यांच्यातील वादाचे मनोरंजन जनतेसाठी नेहमीचेच झाले आहे. आता जारकीहोळींनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा हेब्बाळकरांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.