शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी हलगा -मच्छे बायपास मार्गाची पाहणी केली. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना रमेश जारकीहोळी यांनी भ्रष्ट आणि लाचखाऊ अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा इशारा दिला आहे.
हलगा – मच्छे बायपासशी संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असूनही बळजबरीने हे काम सुरु करण्याचे षडयंत्र सुरु असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसान भरपाईचे आमिष दाखविण्यात येत आहे. दरम्यान ही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कमिशनची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे आणि पुरावे सादर करा, तक्रार करा, नक्कीच त्या अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवू असा इशारा दिला आहे.
सदर प्रकरणात ७७ लाखांपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठी ११ लाखांचं एकमिशन मागण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना रमेश जारकीहोळी म्हणाले, की आम्ही भ्रष्टाचार करत नाही, आणि भ्रष्टाचार करू देत नाही. आणि अशा भ्रष्ट आणि लाचखाऊ अधिकाऱ्यांना नक्कीच घरचा रस्ता दाखविण्यात येईल. आज जिल्हाधिकाऱ्यांना तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पाठविण्यात आले होते. सायंकाळपर्यंत जिल्हाधिकारी अहवाल सादर करतील. त्यानंतर चर्चा करून या समस्येवर तोडगा काढू आणि निर्णय घेऊ असे आश्वासन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिले.
‘त्या’ बाईंचा ‘माईंड आउट’!: रमेश जारकीहोळी
ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि रमेश जारकीहोळी यांच्यातील वादाचा संघर्ष हा दिवसेंदिवस वाढत चालला असून एकमेकांना टार्गेट करण्याचा प्रकार हा सुरूच आहे. आज एका पत्रकार परिषदेत लक्ष्मी हेब्बाळकर यांचे ‘माईंड आउट’ असल्याची टिप्पणी रमेश जारकीहोळी यांनी केली.
शुक्रवारी सांबरा विमानतळावर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर ग्रामीण मतदार संघात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत गोकाकमधून त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची स्पष्टोक्ती केली होती. या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांनी ‘मोस्ट वेलकम’ अशी प्रतिक्रिया देत पुन्हा हेब्बाळकरांना टोला लगावला होता. परंतु एकमेकांवर टीका – टिप्पणी करण्याची मालिका आजपर्यंत संपली नसून पत्रकार परिषदेत मान्यवर, आमदार, मंत्री आणि पत्रकारांसमोर चक्क ‘माईंड आउट’ असणाऱ्या आमदार असा उल्लेख रमेश जारकीहोळीनंनी केला. त्या बाईचा माईंड आऊट झाला असून बस स्थानकात जाऊन शोधावा लागेल अशी टिप्पणी केली
राजकारणात टीका – टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप या गोष्टी नवख्या नाहीत. परंतु गेल्या दीड – दोन वर्षांपासून सुरु असलेले हे ‘कोल्ड वॉर’ आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत कोणते स्वरूप धारण करेल? याची शाश्वती नाही. तोवर राजकारणातील हे असे ‘स्पीच स्टंट्स’ जनतेच्या करमणुकीचे नक्कीच ठरतील, यात शंका नाही.