प्रसुतीपूर्व गर्भलिंग परीक्षण करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली. आरोग्य विभागाच्या वतीने सुवर्णविधानसौधमध्ये शुक्रवारी (दि. २६) तालुका आरोग्यधिकाऱ्यांसाठी ‘राज्यस्तरीय गर्भपूर्व आणि प्रसुतीपूर्व भ्रूणलिंग चाचणी कायदा १९९४’ संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा कुटुंब कल्याण आणि प्रसूती पूर्व, गर्भधारणापूर्व भ्रूणलिंग परीक्षण कायदा अधिकारी डॉ. एम. व्ही. किवडसन्नवर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रसुतीपूर्व भ्रूणलिंग परीक्षण कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यावेळी दिले.
या बैठकीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा (उत्तर कर्नाटक) विभागाचे अपर संचालक डॉ. आप्पासाहेब नरट्टी यांनी कायद्यासंदर्भात माहिती दिली. उपसंचालक डॉ.. चंद्रकला, जिल्हाधिकारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, बेळगाव विभागाचे उपसंचालक डॉ. शैलजा, संसाधन अधिकारी डॉ. इंदुमती आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
बसवराज यलीगार, हालप्पा पाडियार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर जिल्हा आरोग्य शिक्षणाधिकारी शिवाजी यांनी आभार मानले. यावेळी बेळगाव विभाग व्याप्तीतील तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.