कर्नाटकात लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू होणार नाही, अशी माहिती शनिवारी कर्नाटकाचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे. आठवड्याच्या शेवटी किंवा रात्रीच्या वेळी कर्फ्यू जाहीर होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
साऊथ आफ्रिका किंवा ब्राझीलमधून अद्याप एकही असा रुग्ण आढळला नसून युके हुन बंगळूरला आलेल्या कोणत्याही प्रवाशाला शहरात प्रवेश देण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, आरोग्य कर्मचारी आणि अनेक डॉक्टर्स सोशल मीडियावर गॉसिप करण्यात व्यस्त आहेत, परंतु यापैकी कोणीही पुढाकार घेऊन कोविड लस घेण्यास येत नाहीत. बंगळूरचे म्युनिसिपल कमिश्नर एन. मंजुनाथ प्रसाद यांनी शुक्रवारी जनतेला सूचना दिल्या आहेत. सरकारने दिलेल्या मार्गसूचीचे काटेकोर पालन करण्यात न आल्यास कोविड चा फैलाव वेगाने पसरू शकतो. यामुळे पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल.
विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकींचाही त्यांनी आढावा घेतला. महाराष्ट्र, केरळ राज्यात दिवसागणिक दुप्पट वेगाने कोविडचा फैलाव होत आहे. यामुळे आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गसूचीचे पालन करण्याची सूचना आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी दिली. सहा लाखाहून अधिक लोकांना कोविड लस देण्यात आली असून कर्नाटकातील कोविड रुग्णांची संख्या अद्याप स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.