कोरोनाची भीती आता पुन्हा वाढू लागल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा आणि सोयीसाठी शहरातील मराठा मंडळ डेंटल कॉलेज (एमएमडीसी) येथे मंगळवार दि. 23 फेब्रुवारीपासून नवे कोरोना तपासणी केंद्र सुरू होणार आहे.
मराठा मंडळ डेंटल कॉलेज आणि लेक व्ह्यू गोवावेस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केल्या जाणाऱ्या या कोरोना तपासणी केंद्रास रोटरी क्लब बेळगावचे सहकार्य लाभणार आहे.
सदर केंद्राचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. सध्या शहरांमध्ये बीम्स, केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि आयसीएमआर प्रयोगशाळेमध्ये कोरोना तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. मराठा मंडळ डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. रमाकांत नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रांतपाल संग्राम पाटील यांच्या हस्ते मराठा मंडळमधील कोरोना तपासणी केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून उत्कर्षा पाटील आणि मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागरराजू हलगेकर उपस्थित राहणार आहेत. सदर कोरोना तपासणी केंद्रासाठी लेक व्ह्यू हॉस्पिटल गोवावेस येथे नागरिकांच्या सोयाबीनचे नमुने घेतले जातील. मात्र त्याची तपासणी मराठा मंडळ डेंटल कॉलेजच्या आरटी -पीसीआर मशीनवर केली जाणार आहे.
लेक व्ह्यू हॉस्पिटल गोवावेसचे डॉ. शशिकांत कुलगोड यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांच्या घरी जाऊन घशातील स्त्रावाचे (स्वॅब) नमुने गोळा करण्याची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली आहे. सद्यपरिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर एमएमडीसी आणि लेक व्ह्यू हॉस्पिटल यांच्याकडून सदर कोरोना तपासणी केंद्र सुरू केले जात आहे. या केंद्राद्वारे घरी जाऊन तपासणीची प्रक्रिया पार पाडण्यात बरोबरच एका दिवसात कोरोना तपासणी अहवाल उपलब्ध करून दिला जाईल, असे रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष डॉ. के. एम. केळुसकर यांनी खात्रीपूर्वक सांगितले आहे. दरम्यान सध्या शहरामध्ये बीम्स येथे स्वॅबचे नमुने घेऊन तपासणी केली जाते.
त्याचप्रमाणे केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे देखील स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीची सुविधा आहे. आयसीएमआर /एनआयटीएम येथे फक्त स्वॅबचे नमुने तपासले जातात. मराठा मंडळ येथे लेक व्ह्यू हॉस्पिटल येथे गोळा केलेल्या स्वॅबच्या नमुन्याची तपासणी केली जाईल.