बेळगाव महापालिकेसमोरील लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात मला थोडी मुदत द्या, येत्या शनिवारी संबंधित अधिकाऱ्यांची आणि कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
बेळगाव महापालिकेसमोर काही विघ्नसंतोषी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या लाल-पिवळ्या ध्वजामुळे तेथील राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे. तेंव्हा हा ध्वज तात्काळ हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच लाल-पिवळ्या ध्वजामुळे महापालिका आवारातील राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान, सदर ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी यापूर्वी लोकशाही मार्गाने वारंवार केलेली मागणी, तसेच वादग्रस्त लाल-पिवळ्या ध्वजामुळे कांही दिवसांपूर्वी निर्माण झालेली तणावग्रस्त परिस्थिती याची पुन्हा एकवार जिल्हाधिकाऱ्यांना माहिती करून दिली.
त्याचप्रमाणे त्या लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात निर्णय घेण्यास विलंब होत असून आता लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आम्हाला ठोस पावले उचलावी लागतील असा इशाराही समितीच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना दिला.
समिती नेत्यांचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक व इतर कांही महत्त्वाच्या कामामुळे लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भातील निर्णय राहून गेल्याचे नमूद केले. तसेच मला आणखी थोडा वेळ द्या असे सांगून महापालिकेसमोरील लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात येत्या शनिवारी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांची तसेच कन्नड संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणाऱ्या समितीच्या शिष्टमंडळामध्ये दीपक दळवी यांच्यासह माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी आणि म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांचा समावेश होता. दरम्यान, महापालिके समोरील वादग्रस्त लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची वाट पाहून येत्या रविवारी 28 फेब्रुवारी रोजी दुपारी महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलावून पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे प्रकाश मरगाळे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.