सोमनट्टी येथील रहिवासी सागर गंगाप्पा पुजेरी (वय 23) हा तरुण बेपत्ता झाल्याची फिर्याद मार्केट पोलीस स्थानकात देण्यात आली होती. महाद्वार रोड येथील चोन्नद स्टील इंडस्ट्रीज येथे काम करत असणारा हा तरुण बेपत्ता झाला होता. सदर प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस आयुक्त एस. आर. कट्टीमनी पोलीस निरीक्षक संगमेष शिवयोगी आणि सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला असून या प्रकारांतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर खून हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचे उघडकीस आले असून सागरच्या पत्नीनेच याचा काटा काढल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बाळाप्पा भगवंतप्पा दिन्नी (रा कोळ्यानट्टी), बसवराज यल्लाप्पा उप्पार (रा. कोळ्यानट्टी), मंजुनाथ पिराप्पा बीडी (रा. संपगांव), निलम्मा सागर पुजारी (रा. सोमनट्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आठ महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचे अपहरण करुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. या तिन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
सागरची पत्नी नीलम्माची पहिला आरोपी बाळाप्पा याच्याशी सलगी निर्माण झाली होती. लग्नानंतरही या दोघांचे अनैतिक संबंध सुरुच होते. या अनैतिक संबंधामुळे दोघांनी सागरचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार संशयित बाळप्पाने बसवराज आणि मंजुनाथ या दोघांना आपल्यासोबत घेऊन 11 फेब्रुवारीला सागरचे अपहरण केले.
त्यानंतर जोयडा येथील सुपा डॅमजवळील गणेश मंदिर येथे नेऊन त्याला झोपेच्या गोळ्या देवून त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह उळवीनदीजवळील दरीत फेकला. याबाबत पोलिसांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवून तपास चालविला होता. मात्र, सागरचा खून झाल्याचे सोमवारी उघडकीस येताच खुनाचा गुन्हा दाखल कर घेण्यात आला.