पूर्णपणे बेळगाव भागात चित्रित केला जाणारा आणि प्राधान्याने स्थानिक कलाकार असणारा तरुण पिढीवर आधारित “गली मेट्स” या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून ऑडिशन्स येत्या दि. 19, 20 व 21 फेब्रुवारी रोजी असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक सुप्रसिद्ध मराठी कलाकार विकास पाटील यांनी दिली.
“गली मेट्स” या नव्या मराठी चित्रपटासंदर्भात शहरामध्ये मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विकास पाटील बोलत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गली मेट्स चित्रपट यावर्षी तयार केला जाणार असून हा चित्रपट पूर्णपणे बेळगाव भागात चित्रित केला जाणार आहे. या चित्रपटात बेळगाव परिसरातील जास्तीत जास्त कलाकारांना वाव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पूर्णपणे तरुण पिढी वर आधारित असणाऱ्या या चित्रपटाची कथा कॉलेज, गल्ली आणि युवा पिढीचे आयुष्य या परिघा भोवती फिरते. पूर्वीच्या काळी गल्लीमध्ये असणारे खेळ त्यावेळचे वातावरण आदी गोष्टी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे सांगून एक चांगली कथा आम्ही तुमच्या समोर मांडू जी तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करेल, असे विकास पाटील यांनी सांगितले.
मेकअप, संगीत वगैरेंपासून प्रोडक्शनपर्यंतची सर्व जबाबदारी बेळगावच्या इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन ग्रुपचे सदस्य सांभाळणार आहेत. या सर्वांसाठी हा चित्रपट म्हणजे पहिलाच अनुभव असेल. या संपूर्ण प्रोडक्शनमधील 90 टक्के कलाकार व तंत्रज्ञ हे नवे असतील. पुढच्या फ्रेंडशिप डे दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. चित्रपटाचे चित्रीकरण मार्चअखेर ते एप्रिल पर्यंत पूर्ण होईल. येत्या 19, 20 व 21 फेब्रुवारी रोजी चित्रपटासाठी ऑडिशन्स झाल्यानंतर निवड झालेल्या कलाकारांची रीतसर कार्यशाळा घेतली जाईल. त्यानंतर चित्रीकरणाला प्रारंभ होईल, असेही विकास पाटील यांनी स्पष्ट केले.
या चित्रपटाच्या निर्मितीद्वारे आम्ही एक मोठे पाऊल उचलत आहोत, असे इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शनचे अनुप पवार यांनी सांगितले या चित्रपटात प्रामुख्याने स्थानिक कलाकारांना प्राधान्य दिले जाईल असे सांगून बेळगाववासियांनी या चित्रपटाला आधार व पाठिंबा द्यावा असे सांगितले. पत्रकार परिषदेस इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शनचे ऋषिकेश जोशी आदी अन्य सदस्य उपस्थित होते.