निवडणुकीच्या तोंडावर माझ्यावर वैयक्तिक स्वरूपाचे गैरव्यवहार आणि फसवणुकीचे आरोप केले जात आहेत. मात्र त्यात कांहीच तथ्य नाही, सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप बेळगावचे भाजप प्रमुख मुरूगेंद्र गौडा पाटील यांनी केला आहे.
शहरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कणबर्गी येथील सैनिकाच्या कुटुंबाच्या मालमत्तेवर मुरूगेंद्र गौडा पाटील यांच्यासह तिघांनी अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. सैनिकाच्या विजय आणि रोहित या दोन्ही मुलांनाही मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. हे सर्व आरोप पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.
त्याच्याशी माझा कांहीएक संबंध नाही. सर्व आरोप राजकीय प्रेरित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्या महिलेकडे कोणतीही मूळ कागदपत्रे नाहीत. त्यांच्याकडे एक तरी कागदपत्र असेल तर आम्ही भूखंड परत करू. आगामी खासदारकीची निवडणूक आणि महापालिका निवडणूक लक्षात घेऊन माझ्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत, असे मुरूगेंद्र गौडा पाटील यांनी स्पष्ट केले.
कणबर्गी येथील सर्व्हे क्र. 423/1 ही जागा विवादास्पद बनली आहे. भूखंडाच्या वादातून भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्याने लष्करी जवानाच्या मुलावर रॉडने हल्ला केल्याचा आरोप आहे. कणबर्गी येथे गेल्या रविवारी 31 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. मात्र माळमारुती पोलिसांनी प्रकरण दाखल करून घेण्यास टाळाटाळ चालवित असल्याचा आरोप जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी केला असून न्याय देण्याची मागणी काल मंगळवारी 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. लष्करी जवान भिमाप्पा नरसगोळ यांनी 2005 मध्ये कणबर्गी दीड गुंठ्याचा भूखंड खरेदी केला आहे. मात्र पैशाच्या कमतरतेमुळे कांही वर्षे त्यावर बांधकाम केले नाही. अलीकडे कांही दिवसांपूर्वी त्यांनी तिथे घर बांधण्यासाठी तयारी केली होती. मात्र एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्या भूखंडावर दावा सांगितला आहे.
भूखंड ताब्यात घेण्यासाठी 100 रुपयांचा बॉंड पेपर तयार करून जवानांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात येत आहे. तसेच त्या भूखंडाशी तुमचा कोणताच संबंध नसून ती मालमत्ता आपली असल्याचे सांगितले जात आहे. जवानाच्या मुलाने भूखंड आपल्या वडिलांनी खरेदी केल्याचे सांगताच भूखंड खरेदी संबंधित करार पत्र माझ्याकडे आहे असे सांगून बनावट कागदपत्रे दाखविण्यात आल्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे, असे जवानाच्या कुटुंबीयांनी सांगितले. तसेच याबाबत या पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता मुरूगेंद्र गौडा पाटील, बसवराज येळ्ळूरकर तसेच बाहुबली वीरगौडा यांनी रॉडने मारहाण केली आहे. आमच्या आपल्यावर रॉडने हल्ला करण्याबरोबरच पोलिस स्थानकात जाण्याचा सल्ला देखील दिला आहे. तक्रार दाखल करण्यासाठी मारुती पोलिस ठाण्यात गेल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी प्रकरण परस्पर मिटवण्याचा सल्ला देण्यात येत आला आहे.
तेंव्हा कृपया आमची जागा आम्हाला मिळवून द्या, अशी मागणी संबंधित जमीनचा मालक असलेल्या जवानाची पत्नी इंदिरा भिमाप्पा नरसगोळ यांनी काल केली होती. यासंदर्भात आम्ही जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही कुटुंबीयांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मारहाण केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध माळ मारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या जागेवर इतरांनी अतिक्रमण केले असून माझ्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे संबंधित महिलेने म्हटले आहे. सदर प्रकरण सौदा करून मिटवण्यासाठी दबाव आणण्यात येत असल्याचा आरोप देखील इंदिरा नरसगोळ यांनी केला आहे.