कॅन्टोन्मेंट हद्दीतील लीजवर देण्यात आलेल्या विविध जागांची मुदत संपुष्टात येणार असल्याने संबंधित लिजधारकांनी येत्या 31 डिसेंबर 2021 पूर्वी लीज वाढ करून घेण्याची सूचना संरक्षण संपदा अधिकाऱ्यांनी केली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह मुख्य संचालक, संरक्षण संपदा, सदर्न कमांड पुणे यांच्या नांवे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संरक्षण खात्याच्या खुल्या जागा भाडेतत्त्वावर तसेच लीजवर देण्यात आलेल्या आहेत. कांही जागांची मुदत 25 वर्षे तर कांही जागांच्या प्लीज 99 वर्षाच्या कराराने करण्यात आले आहेत. मात्र यापैकी बहुतांश जागांच्या लिजची मुदत संपुष्टात आली आहे. कांही जागांची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत संपणार आहे, अशा मालमत्ताधारकांना लिजची मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, रहिवासी विनियोगा करता असलेल्या जागांचा वापर व्यावसायिक कारणासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे कांही लीजधारकांनी लीजच्या नियम व अटींचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे अशा लिजधारकांना यापूर्वी लिजची मुदत वाढवून देण्यात आली नव्हती. परंतु आता कांही अटी व शर्ती घालून लीजची मुदत वाढवून देण्याचा निर्णय संरक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे अटींचा भंग केलेल्या लीज धारकांना देखील लिजची मुदत वाढवून मिळणार आहे.
मुख्य अधिकारी संरक्षण संपदा सदर्न कमांड पुणे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून लीज वाढीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील जागांच्या लीज मुदत संपलेल्या लिजधारकांनी मुख्य अधिकारी संरक्षण संपदा, सदर्न कमांड -पुणे यांच्या नांवे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याची सूचना एका नोटिशीद्वारे करण्यात आली आहे. नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या 30 दिवसांच्या आत अर्ज करणे बंधनकारक असणार आहे.