कोणतीही भाषा कोणाची वैरी नसते. शब्द आणि साहित्य हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. व्यक्त होण्याचे आणि स्वतःचे माणूसपण सिद्ध करण्याचे भाषा हे उत्तम साधन असून भाषेमुळेच माणसाचे अस्तित्व टिकून आहे. भाषा या संवाद माध्यमामुळे माणसाचे जीवन सुखकर आणि आनंदी असल्याचे असे प्रतिपादन आजरा येथील प्रा. राजा शिरगुप्पे यांनी केले. येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते.
प्रा शिरगुप्पे म्हणाले माणसाचा जगण्याचा, बोलण्याचा आणि आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न भाषेमुळे सुखकर होतो. प्रत्येकाला मातृभाषेतून व्यक्त होण्याचा मूलभूत हक्क आहे. स्वभाषेचा अभिमान बाळगत असताना इतरांच्या या हक्कावर गदा येणार नाही याचे भान राखणे आवश्यक आहे. भाषेमुळे स्नेहभाव, मित्रत्व आणि सुसंवाद वाढीस लागला पाहिजे. पण दुर्दैवाने राजकारणासाठी भाषेचा वापर द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी केला जात आहे. ते अतिशय चुकीचे आहे. मनामनातील दरी भरून काढण्याचे काम संवादामुळे घडून येते.
संत तुकाराम, ज्ञानेश्वर, बसवन्ना, गुरुनानक या सर्व संतांनी व्यक्त होण्यासाठी लोकभाषेचा आधार घेतला. त्यापाठीमागे भावनिक अस्मितेपेक्षा लोकोद्धार आणि प्रबोधन हाच त्यांचा मुख्य हेतू होता. हे आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रतिकूल परिस्थितीतही सीमाभागातील शाळा संस्था व कार्यकर्त्यांनी मराठी संवर्धनासाठी चालवलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रा. शिरगुप्पे यांनी नमूद केले.
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, भाषेमुळे माणसाची जडणघडण होते. मातृभाषेतून होणारे संस्कार माणसाची शेवटपर्यंत सोबत करतात. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषे शिवाय दुसरे उत्तम माध्यम असू शकत नाही. नारायण कापोलकर म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गेल्या अकरा वर्षापासून प्रतिष्ठान कार्यरत असून प्राथमिक शाळांमध्ये गुणात्मक शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी पुरस्कारांचे वितरण केले जात असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, भूविकास बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, उद्योजक विकास देसाई, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी यांनी मनोगत मांडले. कार्यक्रमाला माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डी एम भोसले, आबासाहेब दळवी, जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, महादेव घाडी, प्रकाश चव्हाण, सुरज लाड, दीपक देसाई, विठ्ठल गुरव, ईश्वर बोबाटे, मरु पाटील यांच्यासह शिक्षक, पालक व मराठी भाषा प्रेमी उपस्थित होते. विवेक गिरी यांनी प्रास्ताविक केले तर वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
पुरस्कारांचे वितरण थाटात
कार्यक्रमात प्रयोगशील शाळा व प्रयोगशील शिक्षकांचा पाच हजार रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माजी आमदार कै. लक्ष्मणराव बिर्जे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रयोगशील शिक्षकाचा पुरस्कार गर्लगुंजी मराठी मुलांच्या शाळेचे शिक्षक संतोष चोपडे यांना तर माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रयोगशील शिक्षिकेचा पुरस्कार गंगवाळी सरकारी शाळेच्या सहशिक्षिका मलिका शेख देण्यात आला. प्रयोगशील शाळेसाठी कै. माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार सावरगाळी सरकारी मराठी शाळेला तर कै. शांताबाई यशवंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रयोगशील शाळेचा पुरस्कार इदलहोंड सरकारी शाळेला देण्यात आला. सामान्य ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेतील विजेत्या विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.