खानापूर येथील बेळगाव गोवा महामार्गावरील इंदिरानगर-हलकर्णी (ता. खानापूर) येथील बेपत्ता युवतीचा मृतदेह खेमेवाडी शिवारातील एका पाण्याच्या खड्ड्यात आढळून आला. निर्मला सदाशिव शिग्गावी (वय 17 वर्षे) असे तिचे नाव असून तिने आत्महत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
निर्मला हीचे कुटुंबीय वीट उत्पादनाच्या कामासाठी खेमेवाडी शिवारात स्थायिक झाले आहेत. निर्मला ही त्यांच्यासोबत राहत होती. गुरुवार पासून ती अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत खानापूर पोलिसात तक्रार देण्यात आली होती.
तिची शोधाशोध सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी खेमेवाडी येथे तिचे कुटुंब राहात असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर तिचा मृतदेह एका खड्ड्यात पाण्यावर तरंगताना आढळून आला.
कुटुंबीयांनी तिच्या लग्नाचा विचार चालविला होता. पण ती लग्नाला तयार नव्हती. यातूनच तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील पुढील तपास करत आहेत.