शहरातील प्यास फाऊंडेशनने सलग 2 वर्षे विकास काम करून पुनरुज्जीवित केलेली केळकर बाग येथील ब्रिटिशकालीन विहीर बेळगाव महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम आज सकाळी पार पडला.
सदर विहीर हस्तांतरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, मनपा आयुक्त जगदीश के. एच. आदी उपस्थित होते. प्रारंभी प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर विहीर हस्तांतराचा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी प्यास फाउंडेशनच्या कार्याचा आदर्श इतर बिगर सरकारी संघटनांनी (एनजीओ) घ्यावा, असे आवाहन केले. आमदार ॲड. अनिल बेनके यांनी विहिरीचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल प्यास फाऊंडेशनचे आभार मानून भविष्यात फाऊंडेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांनी प्यास फाउंडेशनने केळकर बाग विहिरीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प यशस्वी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अध्यक्ष माधव प्रभू यांनी विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी सहकार्य करणार्या श्रीमती देवलापुर, सेंटपॉल हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्यासह सर्व देणगीदार आणि मदत करणाऱ्यांचे आभार मानले. याप्रसंगी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड सीईओ शशिधर कुरेर, केयुडब्ल्यूएसचे सहाय्यक कार्यकारी अभियंता चंद्रप्पा, प्यास फाऊंडेशनचे संचालक अभिमन्यू दगा, अवधूत सावंत, सतीश लाड, दीपक ओऊळकर, सुर्यकांत, विजय भागवत आदींसह हितचिंतक आणि विहीर परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. फाऊंडेशनच्या सेक्रेटरी डॉ. प्रीती कोरे यांनी सर्वांचे आभार मानले.
केळकर बाग येथील सदर विहीर ब्रिटिश काळात शंकर शेटट्प्पा कलघटगी यांनी खोदली होती. मात्र कालांतराने वर्षानुवर्षे वापरात नसल्यामुळे पडझड होऊन तसेच केरकचरा टाकण्यात येत असल्यामुळे विहीर बुजून तिला कचराकुंड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या विहिरीचे पुनर्जीवन करण्याचा दोन वेळा केलेला प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे ही विहीर कायमची इतिहास जमा होण्याच्या मार्गावर होती. यासंदर्भात “बेळगाव लाईव्ह”ने वेळोवेळी आवाज उठवून तत्कालीन पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या विहिरीच्या पुनरुज्जीवनासंदर्भात आवाज उठविला होता.
अखेर कलघटगी यांच्या नातवंडांनी पाणी व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या त्यास फाउंडेशनकडे आपल्या आजोबांची आठवण असलेल्या केळकर बागेतील विहिरीचे अस्तित्व अबाधित ठेवण्याची विनंती केली. तेंव्हा सदर ऐतिहासिक विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याचे आव्हान “प्यास”ने स्वीकारले. त्यानंतर 2018 साली विहिरीचे विकास कार्य हाती घेऊन सलग दोन वर्षात ते यशस्वीरीत्या पूर्ण केले.
यापद्धतीने शहरी भागात पाणी व्यवस्थापन प्रकल्प हाती घेण्याचा हा प्यास फाउंडेशनचा पहिलाच प्रयत्न होता. सदर विहिरीवर 2019 मध्ये महापालिकेकडून जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली. गेल्या 2019 मध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन हिंडलगा पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेले, त्यावेळी पहिल्यांदा ही विहीर प्रकाशझोतात आली.
या विहिरीद्वारे महापालिकेतर्फे बेळगाव उत्तर भागात पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे या विहिरीमुळे परिसरातील सुमारे 1000 नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाली आहे. महापालिकेच्या प्रशासनाने वेळोवेळी या विहिरीच्या पाण्याची तपासणी करून ते पिण्यासाठी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे.