पहाटे पेपर टाकण्याचे काम करून मिळालेल्या पैशात मोबाईल फोन आणि सायकल घेऊन स्वतःच्या हिंमतीवर ऑनलाइन शिक्षण घेत असलेला विनोद अजप्पा रामण्णावर हा विद्यार्थी गोडसेवाडी परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
विनोदची घरची परिस्थिती बेताची असून त्याचे वडील गोडसेवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमनची नोकरी करतात. विनोद दररोज पहाटे 5 वाजता उठून पेपर टाकण्यासाठी बाहेर पडतो.
दररोज सकाळी 100 पेपर टाकण्याच्या कामातून त्याला दरमहा 1 हजार रुपये मिळतात. हे पैसे साठवून वर्षभरात त्याने स्वतःसाठी मोबाईल फोन आणि सायकल खरेदी केली आहे. स्वतःच्या हिंमतीवर घेतलेल्या मोबाईल फोनद्वारे त्याचे ऑनलाईन शिक्षण देखील सुरू आहे. सकाळची कामे आटोपल्यानंतर विनोद दिवसभर अभ्यास करतो.
मोबाईल आणि सायकल घेतल्यानंतर स्वतःचे असे कांहीही खर्च नसल्यामुळे आपण आता दरमहा मिळणारा पगार आपल्या आईकडे सुपूर्द करतो असे सांगून भविष्यात आपण स्वतःची मोटरसायकल खरेदी करणार असल्याचे विनोदने सांगितले.
शहरातील डिजिटल फिटनेस हब या संस्थेचे हर्षद कलघटगी यांनी परिस्थितीसमोर हताश न होता इतक्या लहान वयात स्वतःच्या हिंमतीवर शिक्षण घेणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या विनोद रामण्णावर याचे खास कौतुक केले आहे. तसेच सोशल मीडियावर या आदर्श मुलाचे कर्तुत्व शेअर केले आहे.
https://fb.watch/3ztpxpu03h/