शहरातील गोगटे सर्कल येथे मध्यभागी पोलीस बूथ उभारण्याची आणि सर्कलचे सौंदर्यीकरण करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी उद्योगपती शिरीष गोगटे यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
उद्योगपती शिरीष गोगटे यांनी आज बुधवारी सकाळी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन आणि गोगटे सर्कल सौंदर्यीकरणाचा आराखडा त्यांना सादर केला.
गोगटे सर्कल येथे मध्यभागी पोलीस बूथ उभारण्याबरोबरच सौंदर्यीकरण करून सर्कलचा सर्वांगीण विकास साधण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही आराखडा देखील तयार केला आहे. यासंदर्भात आम्ही रहदारी व गुन्हा विभागाच्या पोलिस उपायुक्तांशी चर्चा केली आहे. त्यांनी आमच्या या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवून मान्यता दिली आहे.
ऊन, पाऊस आणि अपघातांपासून संरक्षण मिळावे यासाठी गोगटे सर्कलच्या मधोमध रहदारी पोलिसांसाठी बूथ उभारला जाईल. रहदारीस कोणताही अडथळा न आणता हे विकास काम तसेच सर्कलचे सौंदर्यीकरण केले जाईल. यासाठी रस्त्याच्या चारही बाजूला रिफ्लेक्टर्स बसविले जातील. सर्कल परिसरात रहदारी सुरक्षा सूचना फलक उभारले जातील. फुलझाडांच्या कुंड्या आदींद्वारे गोगटे सर्कलचे सौंदर्यीकरण केले जाईल.
सदर नियोजित प्रकल्पाला पोलीस आयुक्तांनी देखील परवानगी दिली आहे. तेंव्हा गोगटे सर्कलचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण देखील आम्हाला परवानगी द्यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. मनपा आयुक्तांना निवेदन सादर करतेवेळी शिरीष गोगटे यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी उपस्थित होते.