न्यायालयाचा स्थगिती आदेश उठवण्यात आल्याचे कारण पुढे करून मच्छे -हलगा बायपास रस्त्याचे काम सुरू करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांचा डाव संतप्त शेतकऱ्यांनी हाणून पाडल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी चक्क रस्ते कामासाठी आणलेल्या जेसीबीसमोरच लोटांगण घातले.
मच्छे -हलगा बायपास रस्त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी हिरावल्या जाणार आहेत. यासाठी या रस्त्याच्या विरोधात येथील शेतकरी सातत्याने आंदोलन छेडत आहेत. सदर बायपास रस्त्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेऊन शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश मिळविला होता.
मात्र तरीदेखील आज मंगळवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा स्थगिती आदेश उठविण्यात आला असल्याचे सांगून जेसीबीच्या साहाय्याने रस्ते कामाला प्रारंभ करण्याचा प्रयत्न केला. तथापि याबाबतची माहिती मिळताच तात्काळ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला विरोध केला. बायपास रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार असाल तर प्रथम आमचे प्राण घ्या, असे सांगून कांही शेतकऱ्यांनी चक्क जेसीबीसमोरच लोटांगण घातले.
यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी संतप्त शेतकऱ्यांची बाजू मांडताना उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. न्यायालयाचा स्थगिती आदेश उठविण्यात आला असल्याचे सांगत असाल तर रस्त्याचे काम सुरू करण्याचे अधिकृत परवानगी पत्र दाखवा? असा सवालही नाईक यांनी केला त्याचप्रमाणे पोलिसांची दिशाभूल करून त्यांच्या बंदोबस्तात रस्त्याचे काम करू पहात आहात का? असा जाब देखील विचारला. तेव्हा उपस्थित अधिकारी निरुत्तर होऊन उडवाउडवीची उत्तरे देताना दिसून आले. याप्रसंगी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी महिलांनी देखील नियोजित रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडले होते. हा रस्ता झाला तर आमची शेत जमीन जाणार आहे आणि तसे झाल्यास आमच्याकडे जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही अशी प्रतिक्रिया सुमित्रा बसवंत अनगोळकर या वयस्क शेतकरी महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. तसेच आम्ही येथून उठणार नाही आमचा जीव गेला तरी बेहत्तर कसेही त्यांनी सुनावले. मच्छे -हलगा बायपास रस्त्याच्या विरोधात आज सकाळी शेतकऱ्यांनी छेडलेले आंदोलन दुपारी उशिरापर्यंत सुरू होते.