विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारी ( दि. १० फेब्रुवारी) पुन्हा परिवहन कर्मचारी संपावर जाणार आहेत. मात्र या संपामुळे बससेवा विस्कळीत होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली. परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बस वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बंगळूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी ही माहिती दिली असून परिवहन कर्मचारी मागण्याच्या पूर्ततेसाठी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. यापूर्वीही ३ ते ४ दिवस आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. दरम्यान, यावेळी सर्व बससेवाही ठप्प झाली होती. सरकारच्या वतीने या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्याप या मागण्या पूर्ण न झाल्याने पुन्हा परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येईल.
परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. त्यांच्या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर या समस्या सोडविण्यात येतील. तसेच या मागण्याही पूर्ण करण्यात येतील, या संपाचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासन लक्ष्मण सवदी यांनी दिले.