खानापूर- गुंजी-लोंढा- रामनगर ते गोवा अर्धवट काम झालेले अवस्थेतील रस्ता अत्यंत खराब झाल्याने या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. तेंव्हा प्रवाशांची गैरसोय आणि त्यांना होणारा त्रास दूर करण्यासाठी लोंढा ते मिरज पॅसेंजर रेल्वे पूर्ववत सुरू करावी, अशा मागणीचे ट्विट महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केंद्रीय रेल्वेमंत्री, नैऋत्य रेल्वे आणि हुबळीच्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे केले आहे.
खानापूर- गुंजी-लोंढा- रामनगर ते गोवा पर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. रस्ता खराब झाल्याने खानापूर आगाराने देखील या मार्गावरील बसेस पूर्णतः बंद केल्याने खानापूर- गुंजी-लोंढा- रामनगर येथील रहिवाशांचे हाल सुरू आहेत. काल मंगळवारी तर एका बसमध्ये प्रवासी अक्षरशा कोंबल्याने श्वासोच्छ्वास करताना न आल्यामुळे गुदमरून 2 विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्या होत्या.
2019 साली जेंव्हा या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार होते तेंव्हाच म. ए. युवा समितीने या मार्गावरील रेल्वे सुरू करा, अशी मागणी केली होती. पुढे नोव्हेंबर 2019 ला वास्को ते बेळगाव ही पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू झाली होती. मात्र त्यानंतर कोरोनाचे संकट उदभवल्याने ही पॅसेंजर रेल्वे बंद केली गेली ती आजवर बंदच आहे.
कालचा विद्यार्थिनी बेशुद्ध होण्याचा प्रकार पाहता या मार्गावर रेल्वे सुरू करणे काळाची गरज आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने लोंढा ते मिरज या मार्गावर पॅसेंजर रेल्वे सुरू करा अशा मागणीचे ट्विट देशाचे रेल्वेमंत्री, दक्षिण -पश्चिम रेल्वे, व हुबळीच्या रेल्वे अधिकाऱ्यांकडे करण्यात आले आहे.