पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली खडेबाजार पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील जनतेसाठी आज जनसंपर्क सभा बोलाविण्यात आली होती. कायदा, सुव्यवस्था, रहदारी आणि इतर बाबींवर सूचना, सल्ला, प्रतिक्रिया आणि अभिप्राय देण्यासाठी या पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील नागरिकांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. गेल्या कित्येक वर्षानंतर डीसीपी विक्रम आमटे यांच्या पुढाकारातून बोलाविण्यात आलेल्या या बैठकीला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आणि आपल्या परिसरातील अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील केली. या बैठकीत प्रामुख्याने रहदारी आणि वाहतुकीशी संबंधित नागरिकांनी सूचना केल्या.
रामलिंग खिंड गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, शनिवार खूट आणि अशा अनेक महत्वाच्या बाजारपेठेला जोडणाऱ्या मार्गांवर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. याचप्रमाणे पार्किंगची सोय योग्य रीतीने करण्यात आली नसल्याने अनेक ठिकाणी पार्किंगची समस्या देखील वाढत चालली आहे. या समस्येवर महानगरपालिका आणि रहदारी पोलीस विभागाच्या सहयोगाने लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी उपस्थित नागरीकातून सूचना करण्यात आल्या.
या बैठकीला विकास कलघटगी यांनी शहरातील वाहतूक समस्येविषयी नागरिकांच्यावतीने पोलिसांशी चर्चा केली आणि महत्वाच्या सूचना दिल्या. बेळगावची बाजारपेठ मोठी असून या बाजारपेठेत गोवा, महाराष्ट्रासह इतर आजूबाजूच्या तालुक्यातून अनेक नागरिक सातत्याने येतात. त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय शहरात योग्यरितीने करण्यात आली नाही. तसेच परगावाहून येणाऱ्या अशा नागरिकांना हेरून सावजाप्रमाणे चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊन नंतर आता बाजारपेठ पूर्वपदावर येत आहे. परंतु परगावाहून येणाऱ्या नागरिकांवर अशा पद्धतीने कारवाई करण्यात येत असल्याने बाजारपेठेवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे महानगरपालिका आणि रहदारी पोलीस विभागाच्या वतीने शहरातील भंगी पॅसेजचा वापर करून त्याठिकाणी दुचाकी पार्किंगची सोय करून देण्यात यावी. रामलिंग खिंड गल्ली परिसरात चारचाकी वाहने पार्किंग करण्यात येत असून यामुळे अनेकवेळा वादावादीचे प्रसंग उद्भवत असून येथील पार्किंग समस्येवरही तोडगा काढण्याची विनंती परिसरातील नागरिकांनी दिली.
मारुती गल्ली, रामदेव गल्ली, सरदार हायस्कुलच्या बाजूला असलेल्या व्यापारी संकुलाच्या जागेत, वनिता विद्यालय मैदान परिसरात शाळेच्या वेळेनंतर दुचाकींसाठी पार्किंगची सोय करून देण्यात यावी. सर्व सोयींनीयुक्त असे पार्किंग केल्यास जनता पैसे देण्यासही टाळाटाळ करणार नाही. सध्या शहरात अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. दरम्यान सर्व सूचना फलक काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहतुकीबद्दल योग्य सूचना मिळत नाहीत, आणि त्यावेळी तात्काळ रहदारी पोलीस विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. हे अत्यन्त चुकीचे आहे. सर्वप्रथम सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आणि त्यानंतर कारवाई करावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
पार्किंगच्या समस्येचा विचार करून शनिवार खूट आणि खंजर गल्ली परिसरात बहुमजली वाहनतळ उभारण्याचा संकल्प असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. यासंदर्भात कामकाज सुरु असून लवकरच पार्कींगची समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. तसेच ११२ या हेल्पलाईन विषयी माहिती देण्यात आली. ११२ हेल्पलाइनचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात आले. आणि कोणत्याही आपत्कालीन काळात या हेल्पलाइनचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला. तसेच आपल्या आजूबाजूला होणाऱ्या गांजा, चरस यासारख्या इतर अनुचित प्रकारांची चाहूल मिळताच नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. अशापद्धतीची माहिती देणाऱ्या नागरिकांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असा भरवसाही पोलिसांनी नागरिकांना दिला. शहर परिसरातील गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे महत्वाचे असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.
याव्यतिरिक्त उपस्थित नागरिकांनी इतर असुविधांविषयीही पोलिसांशी चर्चा केली. नागरिकांच्या सूचनांवर पोलीस विभागाने विचार करून नागरिकांना उत्तम कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले. यापुढील काळातही अशा सूचनांचे स्वागत करून शहरात उत्तम कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून पाऊले उचलण्यासाठी प्रत्येक तिमाहीत अशी जनसंपर्क सभा घेण्यात येणार असल्याचे डीसीपी विक्रम आमटेंनी सांगितले.
या बैठकीला पोलीस उपायुक्त विक्रम आमटे, खडेबाजार एसीपी चंद्रप्पा, खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, रहदारी विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस निरीक्षक तसेच खडेबाजार पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.