हलगा – मच्छे बायपासला सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले असूनही महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने दडपशाही करण्यात येत आहे. पुन्हा बायपासचे कामकाज हाती घेण्यात आले असून या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी एम. जे. हिरेमठ यांनी नियोजित हलगा-मच्छे बायपास ठिकाणी भेट देऊन परिस्थितीतीची पाहणी केली.
तसेच या बायपासप्रश्नी शेतकऱ्यांसमवेत चर्चादेखील केली. यावेळी शेतकऱ्यांनी या बायपासला आपला विरोध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच या बायपाससंदर्भात पोलीस विभाग आणि अधिकाऱ्यांची होत असलेली दडपशाही याविरोधात तक्रारही केली.
शनिवारी सकाळी ७.३० वाजता जिल्हाधिकारी हलगा – मच्छे बायपास मार्गावर दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांची बाजू त्यांनी ऐकून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या समस्या सांगितल्या. झिरो पॉईंट हा फिश मार्केट पासून सुरु होत असूनदेखील बेकायदेशीररीत्या हलगा – मच्छे मार्गावर या बायपासचा घाट घालण्यात आला आहे. नुकसान भरपाईचे आमिष दाखवून, लाखो करोडो रुपये देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. हलगा – मच्छे येथील शेतजमीन हि सुपीक आहे.
अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या शेतीवरच अवलंबून असून कोणत्याही शेतकऱ्याने या बायपासचा संमती दिली नाही. एजंट आणि भूमाफिया यासंदर्भात हस्तक्षेप करत असून शेतकऱ्यांना विविध प्रलोभने दाखविण्यात येत आहेत. केवळ दहा टक्के शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई घेतली आहे. पण उर्वरित ९० टक्के शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नको तर त्यांच्या जमिनी हव्या आहेत. या जागेचे परीक्षण करण्यात यावे. याठिकाणी बायपास झाला तर सुपीक जमिनी उद्धवस्त होतील, अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडेल, आजूबाजूच्या जनजीवनावर परिणाम होईल आणि या परिसरातील उद्योग – व्यवसायावरदेखील परिणाम होईल.
त्यामुळे हे कामकाज त्वरित थांबवावे, आणि अधिकाऱ्यांची होत असलेली दडपशाही थांबविण्यात यावी, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या सर्व परिस्थितीवर विचार करून, अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.