देशभरातील कोविड परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच पुन्हा एकदा कोविडची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता वाटत आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये याची चाहूल लागली असून दुप्पट वेगाने कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनानेदेखील पूर्वखबरदारीसाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून कोविड नियंत्रणासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर विविध ठिकाणी चेकपोस्ट स्थापन करण्यात आले असून सरकारी मार्गसूचीनुसार सर्व सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार कोविडचा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता असून महाराष्ट्र आणि केरळ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निगराणी ठेवण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक तीव्रतेने होत असून विमान, बस, रेल्वे किंवा खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या नागरिकांवर सरकारी मार्गसूचीनुसार नजर ठेवण्यात येत आहे. इतर राज्यातून बेळगावमध्ये प्रवेश घेणाऱ्या नागरिकांसाठी ७२ तासाचे कोव्हीड रिपोर्ट निगेटिव्ह असणे अनिवार्य असून जिल्ह्यात सीमेवर 14 ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या चेकपोस्टवर हे रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सर्व प्रकारच्या सुरक्षा उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
बेळगाव शहर पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक, जनरल मॅनेजर : दक्षिण पश्चिम रेल्वे, हुबळी आणि सांबरा विमानतळ संचालक, बेळगाव आणि चिकोडी विभाग प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी, बेळगाव व अतिरिक्त जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी आणि जिल्ह्यातील इतर विभागीय अधिकारी तसेच इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या तपासणीसाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
जिल्ह्यातील कोविड संदर्भातील पूर्वखबरदारी आणि नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कोगनोळी चेक पोस्ट वर भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तेथील कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचनादेखील देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासमवेत जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकारी लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलीस वरिष्ठ अधिकारी अमरनाथ रेड्डी आणि इतर उपस्थित होते.