स्मार्ट सिटीच्या नांवाखाली केलेल्या सततच्या खोदाईमुळे टिळकवाडी येथील सी. डी. देशमुख या प्रमुख रस्त्याची पार दुरवस्था होऊन तो ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यासदृश्य बनवा असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली केलेल्या सततच्या खोदाईमुळे टिळकवाडी येथील सी.डी. देशमुख रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून गेल्या कित्येक महिन्यांपासून या रस्त्यावर फक्त माती खडी यांचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. सदर रस्ता आरपीडी कॉर्नर ते पहिल्या रेल्वे गेटपर्यंतचा टिळकवाडीतील सर्व पेठांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. सध्या या रस्त्याची अवस्था पाहता हा शहरातील रस्ता आहे की ग्रामीण भागातील कच्चा रस्ता आहे? असा प्रश्न या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना पडू लागला आहे.
प्रारंभी स्मार्ट सिटीच्या नांवाखाली या रस्त्यावर पाईप घालण्यासाठी खुदाई करण्यात आली. मात्र हे विकास काम बेजबाबदारपणे करण्यात आल्यामुळे खोदताना बाजूला ठेवण्यात आलेली माती तशीच रस्त्यावर पसरून पडली आहे. सध्या ही माती त्रासदायक ठरत आहे. ही माती लोकांच्या डोळ्यात उडत असून आसपासच्या दुकान चालताना व्यवसाय करणे कठीण जात आहे.
एकदा रस्ता तयार करायचा मग पाईप केबल घालण्यासाठी पुन्हा खोदायचा हे याठिकाणी सतत सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकदा या रस्त्याची पाहणी करावी, म्हणजे लोकांच्या गैरसोयीची त्यांना कल्पना येऊ शकेल.
शहरातील रस्त्यांची चाळण करणे हे स्मार्ट सिटीचे काम नव्हे हे अधिकाऱ्याने लक्षात घ्यावे, अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते दीपक अवर्सेकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अवर्सेकर यांनी या रस्त्याचे फोटो बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे आयुक्त शशिधर कुरियर आणि महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना धाडले आहेत.