रोस्ट्रम डायरीज यांच्यावतीने सर्वभाषिक कलाकारांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी काव्य, कथाकथन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रतिभावंत कलाकारांनी सर्वोत्कृष्ट कलांची व प्रतिभांची निर्मिती करुन बेळगावचे नाव जगाच्या नकाशामध्ये कोरावे असा रोस्ट्रम डायरीजचा प्राथमिक उद्देश आहे. बेळगाव येथील ‘हिडन डोअर कॅफे व रेस्टॉरंट’मध्ये झालेल्या या स्पर्धेला स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सागर बेळगुंदकर यांनी स्पर्धेत विजेतेपद तर नेहा कुलकर्णी यांनी उपविजेतेपद मिळविले. श्रोत्यांची पसंती हे पारितोषिक उन्नती कदम व नेहा कुलकर्णी यांना तर विविध भाषेत पुढीलप्रमाणे पुरस्कार देण्यात आले. अरोन डायस (इंग्रजी), पुष्कर ओगले (हिंदी), सीमा साळगावकर (मराठी), नदीम सनदी (कन्नड).
२०२० साली कोरोनाचा सामना करुन बेळगावकरांनी २०२१ मध्ये पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बेळगावातील कलाकारांनी आपली प्रतिभा सादर करण्याचा प्रयत्न केला. रोस्ट्रम डायरीज यांच्यावतीने नेहमीच अशा कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देऊन त्यांचे धाडस वाढविलेले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून रोस्ट्रम डायरीजने तिसर्यावर्षी या स्पर्धांचे आयोजन केले होते. २०१८ मध्ये अशा कला सादर करण्यात आल्या होत्या. त्यावेळी अभिषेक भेंडीगिरी आणि परिणिता आळगुंडीकर यांनी पुढाकार घेऊन या उपक्रमाची सुरुवात केली होती.
जेव्हा संपूर्ण देशभरात लॉकडाऊन होते तेव्हा रोस्ट्रम कम्युनिटीने ऑनलाईन पद्धतीने दोन खुल्या स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन केले होते. असंख्य प्रतिथयश बॉलीवूड रायटर्स, डायरेक्टर्स आणि स्क्रीप्ट रायटर्स हेदेखील याचा एक भाग आहेत.
यंदा रोस्ट्रम कम्युनिटीने पुन्हा ऑफलाईन स्पर्धेचे आयोजन केले. यावेळी या आयोजनात संजना पोवार हिनेही सहभाग घेतला. टीमने ३० जानेवारी रोजी हिडन डोअर कॅफे ऍण्ड रेस्टारंट येथे अकराव्या भागामध्ये काव्य आणि कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. १६ वर्षावरील सर्वांसाठी सर्व भाषेत याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये ३० स्पर्धकांनी भाग घेतला. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व कन्नड या भाषांमधून आपल्या कविता, कथा उत्कृष्टपणे सादर केल्या. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घेतली होती. प्रमुख पाहुणे म्हणून प्यास फौंडेशनचे संस्थापक व जेएनएमसीचे प्रा. डॉक्टर माधव प्रभू, डॉ. सोनाली सरनोबत, सौ. स्वाती जोग, प्रवीण बावडेकर, रघु एम., सौ. माधुरी पटेल, किशोर काकडे उपस्थित होते तर परीक्षक म्हणून डॉ. शोभा नायक व पत्रकार विलास अध्यापक उपस्थित होते.
यावेळी ‘‘ टेरिबली मायक्रो टेल्स ’’ या नावाने रोस्ट्रम डायरीच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. देशभरातून आलेल्या हजारो कवितांमधून निवडक कविताच घेण्यात आल्या आहेत. या पुस्तकात रोस्ट्रम कम्युनिटीच्या प्रतिभावंत आणि सृजनशील कलाकारांनी लिहिलेल्या कविता आणि कथांचा समावेश आहे.
जर आपल्याला हे पुस्तक हवे असेल तर www.rostrumdiaries.in/store या संकेत स्थळावर संपर्क करावा.
या भागाचे आणखीन एक आकर्षण म्हणजे बेळगावचे कलाकार स्वाती हुलमणी व ओमकार जाधव यांनी रोस्ट्रम मर्चन्टडाईज बुकमार्क्स, ग्रीटिंग्ज, कॅनव्हास पेटिंग, पोट्रेट आणि पॉट पेटिंग केले. रोस्ट्रमने त्यांच्या उद्योजकतेला संधी देऊन त्यांचे नैतिक धाडस वाढविले आहे. त्यांच्या आगामी योजनांना वाव दिला आहे. तसेच प्रतिथयश कलाकार, लेखक, कथाकथनकार आदींच्या प्रतिभेला वाव दिला आहे.
प्रमुख अतिथींनी रोस्ट्रम डायरीच्या या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच युवा कलाकारांनी, कलाप्रेमींनी रोस्ट्रमच्या कार्यात सहभागी होऊन योगदान द्यावे आणि बेळगावच्या साहित्य परंपरेत भर घालावी, असे आवाहन केले.