महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोगनोळी, कागवाड -मिरज, अथणी -जत आणि सदलगा -इचलकरंजी या मार्गांवर कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. तसेच कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नसलेल्यांना माघारी धाडले जात आहे.
कर्नाटक रजिस्ट्रेशनची जी वाहने रुग्णांना घेऊन उपचारासाठी महाराष्ट्रात गेली आहेत. त्यांना माघारी परतताना संबंधित रुग्णाच्या उपचाराची कागदपत्रे आणि संबंधितांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटी -पीसीआर चांचणी सक्तीची करण्यात आली आहे. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे.
यासंदर्भात बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली आहे. तसेच कर्नाटकच्या नव्या मार्गदर्शक सूचीची माहिती त्यांना दिली आहे.
त्याचप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकातील प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राच्या आवश्यकतेबद्दल माहिती देण्याची विनंती देखील केली आहे. दरम्यान, तपासणी नाक्यांवर अन्य प्रदेशातील वाहनांची किंवा पुढील संक्रमणासाठी कर्नाटकच्या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार नाही. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी कर्नाटक सरकारने गेल्या शनिवारी कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूची जारी केली आहे.