रस्त्याकडेला पार्क केलेली डिओ दुचाकी चोरट्याने हातोहात लंपास केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी शहापूर छ. शिवाजी उद्यानासमोरील हुलबत्ते कॉलनी कॉर्नरवर घडली असून चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. शहरात या पद्धतीने दुचाकी लांबविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांनी चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
हुलबत्ते कॉलनी कॉर्नरवर इथून काल सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास चोरीला गेलेली पिवळ्या रंगाची डिओ दुचाकी (क्र. केए 22 ईवाय 0570) ही शृंगेरि कॉलनी खासबाग येथील प्रतिष्ठित नागरिक अशोक गगवे यांच्या मालकीची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अशोक गढवे हे काल सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास आपली डिओ शहापूर छ. शिवाजी उद्यानासमोरील हुलबत्ते कॉलनी कॉर्नर येथे रस्त्याच्या कडेला पार्क करून आपला आपल्या मुलाला घेऊन उद्यानात गेले होते. त्यानंतर सातच्या सुमारास मुलाला घेऊन घरी जाण्यासाठी आले असता पार्क केलेल्या ठिकाणी दुचाकी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यामुळे बहुधा पोलिसच आपली गाडी घेऊन गेले असावेत असा गगवे यांचा प्रारंभी समज झाला. मात्र चौकशीअंती तसे कांही झाले नसून आपली गाडी चोरीला गेली आहे हे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हा अशोक गगवे यांनी घटनास्थळानजीक एका घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचे पाहून त्या घर मालकाला विनंती करून सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
तेंव्हा पेन ड्राईव्हमधून दुचाकी चोरीचे फुटेज घेऊन अशोक गगवे यांनी थेट शहापूर पोलीस स्टेशन गाठले. मात्र त्याठिकाणी पोलिसांनी बेजबाबदार वर्तन करत तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. तक्रार नोंदविण्यास गेलेल्या अशोक गगवे यांना पोलिसांनी रायटर नसल्याचे सांगून तसेच आणखी शोधाशोध करा, गाडी कुठे सापडते का बघा नाहीतर उद्या सकाळी येऊन तक्रार नोंदवा असे असा सल्ला देऊन माघारी धाडले.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. तसेच शहर परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या प्रकारांकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.