Friday, December 20, 2024

/

भुतरामनहट्टी प्राणी संग्रहालयात लवकरच सुरु होणार “टायगर सफारी”

 belgaum

म्हैसूर प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर बेळगाव तालुक्यातील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर बेळगाव शहरानजीक असलेल्या भुतरामनहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा प्राणिसंग्रहालयाचा विकास करण्यात येणार असून लवकरच या ठिकाणी वाघ-सिंह आणून पर्यटकांसाठी “टायगर सफारी” सुरू केली जाणार आहे, अशी माहिती आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगावातील वन्य प्राणी आणि पर्यावरण विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सतीश जारकीहोळी यांची नुकतेच भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यावेळी आमदार जारकीहोळी बोलत होते. म्हैसूर प्राणी संग्रहालयाप्रमाणे भुतरामनहट्टी प्राणिसंग्रहालयाचा विकास केला जाईल. परिणामी भुतरामनहट्टी प्रमुख अभयारण्य ठरणार असून याठिकाणी वाघ, सिंह आदी वन्य पशूंना राहण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या निवारा शेडचे काम पूर्ण होत आले आहे.

जागेअभावी हत्ती, गेंडा असे मोठे प्राणी येथे ठेवले जाणार नाहीत. आपल्या मतदारसंघात येणाऱ्या सदर प्राणिसंग्रहालयाचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या ठिकाणी इतर वन्यप्राणी आणणे आवश्यक होते. मात्र कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला आहे. यासाठी 2 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याची माहितीही आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिली.

सदर प्राणिसंग्रहालयात वाघ, सिंह, हरीण, अस्वल, जिराफ यासह इतर प्राणी आणण्यात येणार आहेत. प्राणिसंग्रहालयात पाण्याची आवश्यकता असून यासाठी तलाव भरण्याची योजना सुरू आहे. प्राणिसंग्रहालयासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मृगालयासाठी तलाव बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये वन्य प्राणी आणि पर्यावरणासंदर्भात जागृती करण्याची अत्यंत गरज आहे. वनखात्याकडून सुसज्जित प्राणीसंग्रहालय निर्माणकार्य सुरू आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. या माध्यमातून जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे, असेही जारकीहोळी यांनी नमूद केले.

सिंह, वाघ, अस्वल यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. 34 एकर परिसरात पसरलेल्या या मिनी झूमध्ये (प्राणी संग्रहालय) अनेक प्राणी व पक्षी आहेत. परंतु वाघ व सिंह यासारख्या हिंस्त्र जंगली प्राण्यांना ठेवण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी लागते. त्यामुळे आता परवानगी मिळाल्याने “टायगर सफारी”चा मार्ग मोकळा झाला आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार टायगर सफारी आणि टायगर हाऊस निर्मितीची योजना अंतिम टप्प्यात आहे. टायगर सफारी करण्यासाठी मोठे अरण्य किंवा मोठ्या प्राणीसंग्रहालयात जावे लागते.

मात्र आता भुतरामनहट्टी प्राणिसंग्रहालयातील वाघांमुळे बेळगावच्या नागरिकांना लवकरच टायगर सफारीचा आनंद घेता येणार असून त्यांचे टायगर सफारीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागूनच प्राणिसंग्रहालय असल्यामुळे पर्यटकांची संख्या नक्की वाढेल.

बेळगावच्या वनविभागाने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने अनुमती दिल्याने चार वाघ लवकरच दाखल होणार आहेत या प्राणिसंग्रहालयात वाघ, सिंह, अस्वल, बिबट्या कोल्हा यासह इतर प्राणी व पक्षी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटक राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरणातर्फे याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आमदार सतीश जारकीहोळी यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी वन्य प्राणी आणि पर्यावरण विकास मंचचे अध्यक्ष उरबीनहट्टी, डॉ. डी. एस. मिसाळे, श्रीशैल मठद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.