रहदारी आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी रहदारी पोलीस विभागाच्यावतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. तशी ही मोहीम वर्षभर सुरूच असते. वाहतुकीचे नियम जरी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असले तरी अनेकवेळा या नियमांचा फास सर्वसामान्य जनतेला लागतो, हेही तितकेच खरे आहे.
शहर परिसरात रस्ते आणि सुविधांचा फज्जा उडाला आहे. खड्डेमय, धुळमय आणि पार्किंगची सोय नसलेल्या बेळगावमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी मात्र जनतेलाच शहाणपण शिकवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास जनतेवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यातून अनेक वेळा रहदारी पोलीस आणि जनतेमध्ये वादावादीचे प्रसंग घडून आले आहेत. रविवारी असाच एक प्रसंग बेळगावमध्ये घडला असून यादरम्यान रहदारी पोलिसाच्या उद्धट वर्तनामुळे आपल्या पतीची कोणतीही बदनामी होऊ नये यासाठी एका महिलेने चक्क आपले स्त्रीधन पोलिसांच्या हाती दिल्याची घटना घडली आहे.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाजवळील, मार्केट पोलीस स्थानकाजवळच असलेल्या पै हॉटेल समोर सदर प्रकार घडला असून ग्रामीण भागातून आलेल्या जोडप्याचे वाहन अडवून एका रहदारी पोलिसाने त्यांच्याकडील कागदपत्रांसाठी आणि इतर गोष्टींसाठी तगादा लावला. गावातून शहरात खरेदीसाठी आलेल्या या जोडप्याच्या बाईकवर अनेक पिशव्या होत्या. गाडीच्या नंबर प्लेट वरून हे जोडपे ग्रामीण भागातून असल्याचे हेरून सदर पोलिसाने यांचे वाहन अडवले. आणि विचारपूस सुरु केली. विविध कागदपत्र दाखविण्यासाठी तगादा लावला. सदर कागदपत्रात हे नाही, ते नाही.. असे सांगून तुम्हाला दंड भरावाच लागेल, यासाठी जोडप्याकडे हजारपेक्षा अधिक दंडाच्या रकमेची वसुली करण्यासाठी सदर पोलिसाने तगादाच लावला.
त्यानंतर जोडप्याने आपली चूक झाली. पुढील वेळी सर्व कागदपत्रे नीट घेऊन येण्याचे सांगितले. सध्या आपल्याकडे दंडाची रक्कम भारण्याइतपत पैसे नाहीत, आम्ही गावाहून खरेदीसाठी आलो आहोत. परंतु पुढील वेळी नक्की सर्व कागदपत्रे योग्यपद्धतीने आणू, असे सदर वाहनचालकाने सांगितले. परंतु रहदारी पोलिसाने मात्र त्याची काहीही ऐकले नाही. उलट जोरजोरात आवाज सुरु केला. रहदारी पोलिसांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकदेखील जमा होऊ लागले. यावेळी आपल्या पतीचा मान राखण्यासाठी पत्नीने चक्क आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून पोलिसांच्या हाती दिले. सध्या आमच्याकडे दंडाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत, परंतु तुम्ही हे मंगळसूत्र घेऊन यातून दंडाची रक्कम घ्या, अशी विनवणी तिने पोलिसांना केली. परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले पोलीस महाशय अजूनच जोरजोरात ओरडू लागले. हा सारा प्रकार त्याचठिकाणी असलेल्या एका रिक्षाचालकाने पाहिला. आणि थेट मार्केट पोलीस स्थानकाशी संपर्क साधला. घडलेली सर्व माहिती रिक्षाचालकाने पोलीस स्थानकात कळवली. आणि यावेळी या पोलीस महाशयांनी मद्यप्राशन केल्याचे समोर आले.
वाहतुकीचे नियम हे जनतेच्या सुरक्षिततेसाठीच बनविण्यात आले आहेत. परंतु वाहतुकीच्या नियमांबाबत आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती होण्याऐवजी जनतेकडून हजारो रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रहदारी पोलीस आडवळणावर उभे राहून वाहनचालकांना अडवतात. वाहतुकीचे नियम पाळणे हे जनतेचे कर्तव्य आहे. परंतु अशा पद्धतीने दंडाची कारवाई करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत जनता व्यक्त करीत आहे. शहराची अवस्था ही अत्यंत बिकट झाली आहे.
ना पार्किंगची व्यवस्था ना सुस्थितीतील रस्ते, कोणत्याही पद्धतीची वाहनचालकांची सोय नाही. परंतु वाहनचालकांनी एखादी जरी चूक केली, तरी त्यांना अपराधीपणाची वागणूक देण्यात येते. हा सारा प्रकार वेळीच थांबवून रस्ते, पथदीप, सूचनाफलक, दिशादर्शक फलक, पार्कींगची व्यवस्था होणे महत्वाचे आहे. रहदारी पोलिसांनीदेखील जनतेच्या भावना लक्षात घेऊन थोडीतरी सहानुभूती दाखवून, मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याऐवजी, वाहतुकीच्या नियमांबद्दल जनतेला जागरूक करणे आवश्यक आहे.