पंचकुला, चंदिगड येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत कर्नाटकचा महिला संघ सहभागी झाला आहे. या संघाची प्रशिक्षक आणि व्यवस्थापक बेळगावची ज्येष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिसपटू मैत्रयी संगम बैलूर ही आहे हे विशेष होय.
बेळगावची ज्येष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिसपटू मैत्रयी बैलुर हिची अलीकडेच कर्नाटक महिला टेबल-टेनिस संघाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापकपदी निवड झाली आहे. मैत्रयी बैलूरने यापूर्वी राष्ट्रीय व राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत आपली चमक दाखवून अव्वल खेळाडू मध्ये स्थान मिळविताना अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.
तिची कामगिरी आणि अनुभवाची दखल घेऊन कर्नाटक टेबल टेनिस संघटनेने मैत्रयीला कर्नाटक महिला टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे.
कर्नाटक महिला टेबल टेनिस संघातील अर्चना कामत, खुशी विश्वनाथ, अनग्र्या मंजुनाथ, यशस्विनी घोरपडे व मरिया रॉनी या महिला टेबल टेनिसपटू दि. 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान पंचकुला चंदिगड येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.
या सर्व टेबल टेनिसपटूंना मैत्रयी बैलूर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे. कर्नाटक महिला टेबल-टेनिस संघाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापकपदी निवड झाल्याबद्दल अलीकडेच बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत मैत्रयी संगम बैलुर हिचा खास सत्कार करण्यात आला होता. राज्याच्या टेबल टेनिस संघाच्या व्यवस्थापक व प्रशिक्षकपदाचा बहुमान मिळाल्याबद्दल क्रीडा क्षेत्रात मैत्रयीचे अभिनंदन ही होत आहे.