निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार लवकरच राज्यभरातील महानगरपालिकांसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीसाठी सर्व प्रक्रिया पार पाडावी, अशी सूचना देखील राज्य निवडणूक आयोगाने दिली असून या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
बेळगावमधील महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सामान्य तर उपमहापौर पदासाठी सामान्य महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. गेल्या अडीज वर्षांपासून महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला होता.
परंतु सरकारने महानगरपालिकेची निवडणुका जाहीर केल्या नव्हत्या. हुबळी – धारवाड महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने याचिकादेखील दाखल केली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला महानगरपालिका निवडणुका घेण्यासंदर्भात आदेश दिले.
आदेश जारी केल्याच्या सहा महिन्यांच्या आत या निवडणुकीसंदर्भात सर्व तयारी करून निवडणुका घेण्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते. यानुसार नुकतेच मनपा वॉर्ड पुनर्र्चना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज महानगरपालिकेच्या महापौर – उपमहापौर पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.