Wednesday, January 8, 2025

/

शिवसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी बेळगावच्या हिरकणींनी घेतला वसा

 belgaum

गडभ्रमंती हा प्रत्येक शिवप्रेमीच्या जिव्हाळ्याचा विषय. केवळ गडभ्रमंती करणे आणि गड – किल्ले सर करणेच नव्हे तर तर त्या सर्व गडकोटांचे संरक्षण आणि जतन करणे हेही शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. शिवकालीन युगात अशक्य असलेल्या गडावर देखील हिरकणीने गड सर करून इतिहास रचवला. शिवरायांचा इतिहास आजही तितकाच ताजा आणि तितकाच चिरतरुण असा आहे.

प्रत्येक मराठी मनाचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवराय हे आजही बालवृद्धांच्या तना – मनात आणि रक्तात भिनलेले आहेत. याचा प्रत्यय वेळोवेळी येतोच. मागील काळात गड – किल्ल्यांवर अनुचित प्रकार घडू लागले होते. परंतु तमाम शिवभक्तांच्या प्रयत्नाने शिवरायांचा इतिहास आणि शिवकालीन गड जपण्यासाठी मोहीम सुरु झाली. या मोहिमेत केवळ युवकच नाही तर युवतींनीही कंबर कसली. बेळगावमधील अशाच दोन शिवकन्या शिवकालीन गड – किल्ले सर करत शिवकालीन इतिहास आणि मराठी संस्कृतीचा वारसा जपण्याचा संदेश देत आहेत.

बेळगाव तालुक्यातील खाणगाव येथील स्नेहा नागनगौडा आणि श्रुती नागनगौडा या दोन तरुणींनी गड-किल्ले सर करण्याचा विडा उचलला आहे. स्नेहा नागनगौडा ही तरुणी जैन महाविद्यालय येथे बीबीए विभागात शिक्षण घेत आहे तर कलाक्षेत्रात देखील या तरुणीने उत्तम यश संपादन केले आहे. स्नेहा नागनगौडा हिच्या कला, नृत्य क्षेत्रासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारासहित अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तर श्रुती नागनगौडा ही तरुणी निडसोशी येथे शिक्षण पूर्ण करून पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरीसाठी आहे.

‘बेळगाव लाईव्ह’शी बातचीत करताना त्यांनी आपल्या गड – किल्ले भ्रमंती विषयी माहिती दिली. गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेली गड भ्रमंती यासाठी प्रचंड आत्मविश्वासाची गरज लागली. कुटुंबाचा पाठिंबा आणि त्यांनी दिलेली प्रेरणा यामुळे आजपर्यंत कित्येक गड किल्ल्यांवर आम्ही भ्रमंती केली आहे. यासाठी प्रचंड उत्साह, फिटनेस आणि संयम लागतो. हे गड – किल्ले आपल्याला केवळ इतिहासच शिकवत नाहीत, तर त्या काळात घेऊन जातात. यासोबत अनेक गोष्टी शिकवतात. सकारात्मक वृत्तीने जगायलाही शिकवतात. मनात आवड व इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतेही काम अथवा प्रसंग सहजरित्या पार पाडू शकतो, असे मत या दोन्ही बहिणींनी व्यक्त केले.Shruti -snehaस्नेहा नागनगौडा व श्रुती नागनगौडा या दोघी आपापल्या आयुष्यात एका ठराविक क्षेत्रात आपल्या आवडत्या ठिकाणी आयुष्य जगत आहेत. पण त्याच बरोबर या दोघीही आपल्या संस्कृतीचा तितकाच मान ठेवतात . आपली मराठी संस्कृती काय आहे आणि आणि तिचा विसर आजकालच्या पिढीला पडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या या हिंदवी स्वराज्याचे आपण वारसदार आहोत, याहून मोठे भाग्य ते काय? महाराष्ट्राला लाभलेली संपत्ती म्हणजे अखंड सह्याद्री! या सह्याद्रीत असलेले अगणित गड-किल्ले यांचे जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्या सांगतात. स्नेहा व श्रुती या दोघी बहिणी आपल्या कामकाजात मिळालेल्या सुट्ट्या या गड किल्ल्यांसाठी राखीव ठेवतात.

गड किल्ल्यावर फिरताना मानसिक शक्ती, बळ आणि प्रेरणा मिळते ती इतर कुठेच मिळत नाही, असेही त्या सांगतात. प्रत्येक तरुण तरुणींनी आणि समस्त शिवप्रेमींनी अशा तरुणींचा आदर्श घेऊन गड – किल्ल्यांचे जतन करण्यासाठी पुढाकार घेतल्यास अखंड महाराष्ट्रातील गड – किल्ले पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत शिवकालीन इतिहास जागविणारे ठरतील, यात शंका नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.