देसुर ते के. के. कोप्प दरम्यानच्या नियोजित नव्या बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गात बदल करावा, अशी मागणी खासदार (राज्यसभा) इराण्णा कडाडी यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
नवी दिल्ली येथील उद्योग भवन येथे खासदार इराण्णा कडाडी यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून केंद्रीय मंत्र्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव विभागातील रेल्वेच्या विकासासंदर्भात अलीकडेच मी नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची हुबळी येथील कार्यालयात भेट घेऊन देसुर व के. के.कोप्प मार्गे जाणाऱ्या नियोजित बेळगाव ते धारवाड दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गाबाबत चर्चा केली आहे. या नियोजित रेल्वे मार्गामुळे देसुर, प्रभूनगर, गर्लगुंजी, नंदिहळ्ळी व नागेनहट्टी येथील शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.
कारण नियोजित रेल्वे मार्गामुळे या शेतकऱ्यांना वर्षाला 2 -3 वेगवेगळी पिकं देणारी आपली सुपीक काळी जमीन गमवावी लागणार आहे. संबंधित गावांना भेटी देऊन मी तेथील लोकांची मते जाणून घेतली आहेत. या गावांच्या परिसरातील काळा मातीच्या जमिनीत शेतकरी भात, ऊस, रताळी, बटाटे, सोयाबीन आणि भाजीपाल्याची पिके घेतात. त्यामुळे नियोजित रेल्वे मार्गामुळे ही सुपीक जमीन शेतकऱ्यांना गमवावी लागणार आहे. तसे झाल्यास संबंधित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
तेंव्हा बेळगाव ते धारवाड दरम्यानच्या निवडीत रेल्वेमार्गात देसूर ते के. के. कोप्प दरम्यान बदल करावा, ज्यामुळे 8 कि. मी. अंतर तर कमी होईलच शिवाय सरकारचे सुमारे 150 कोटी रुपये वाचतील.
तरी याचा गांभीर्याने विचार करून नैऋत्य रेल्वेच्या नियोजित रेल्वेमार्गाचे वेगळे सर्वेक्षण करण्यास सांगावे, अशा आशयाचा तपशील खासदार कडाडी यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. दरम्यान, खासदार इराण्णा कडाडी यांच्या या कृतीमुळे देसुर, प्रभूनगर, गर्लगुंजी, नंदिहळ्ळी व नागेनहट्टी भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.