बैलवाड गावातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील जनतेला आवाहन केले. अन या गावातील व्यथित मुलाने आपली समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडून जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. वडिलांचे छात्र हरपलेले आणि आजारी आई आणि बहिणीसह एका भाडोत्री खोलीत राहणाऱ्या किरण बसवराज कोण्णीन्नवर या चिमुरड्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्याला आश्रय घर मिळावे, यासाठी निवेदन केले.
आपल्या हस्ताक्षरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मुलाने जिल्हाधिकाऱ्यांसह साऱ्यांचेच लक्ष वेधले. तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या या मुलाने आपल्याला शिक्षणाचा खर्च परवडत नाही, वडील हयात नाहीत, आणि आईचे आजारपण, बहीण संपगांव येथील मुरारजी शाळेत शिकते. या साऱ्यामुळे घरचे भाडे भरणे शक्य नाही. घरचे भाडे भरल्यास घर चालविणे मुश्किल होत आहे. त्यामुळे आपल्याला आश्रय योजनेतून घर मिळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे या मुलाने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे केली. या मुलाचे निवेदन स्वीकार करून त्याला सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बेळगावमधील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी ‘गावाकडे चला…’ अशी हाक दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावातील समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम आखला आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जिल्ह्यातील प्रत्येक गावात वास्तव्य करून सरकारच्या मार्गसूचीनुसार सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत शनिवारी या अभियानाला सुरुवात झाली आहे.
सर्वप्रथम बैलहोंगल येथे भेट देऊन गावातील वर्ती बसवेश्वर देवस्थानाला भेट देऊन ग्राम वास्तव्य उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर २५ लाख रुपयांच्या खर्चातून निर्माण करण्यात आलेल्या सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उदघाटन समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार महांतेश कौजलगीही उपस्थित होते. गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या सीआरएफ शहीद जवान मंजुनाथ मुदकनगौडर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण गावचा फेरफटका मारून पाहणी केली. अनेक घरांना भेटी दिल्या. तेथील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी करियम्मा देवस्थान कामकाजाचा शुभारंभदेखील करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण गावाची पाहणी करून, तेथील समस्या जाणून घेऊन जनतेशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे संयुक्त संचालक चन्नबसप्प कोडली, कृषी विभागाचे संयुक्त संचालक शिवनगौड पाटील, समाज कल्याण विभागाच्या डॉ. उमा सालीगौडर, फलोत्पादन विभागाचे उपनिर्देशक रवींद्र हकाटी, महिला आणि बालकल्याण विभागाचे उपनिर्देशक बसवराज वरवट्टी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.