बेळगावमधील कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली असता पुन्हा एकदा कोरोनाची धास्ती बेळगावकरांना लागण्याची शक्यता आहे. बेळगावमध्ये १ ते २ इतक्या संख्येवर स्थिरावलेली कोरोना रुग्णांची संख्या अचानक एकदिवसात १५ रुग्णांवर येऊन ठेपली आहे.
बेळगाव शहर ६, खानापूर तालुका ६, गोकाक १, हुक्केरी १, सौंदत्ती १ असे एकूण १५ रुग्ण बेळगाव जिल्ह्यात नव्याने आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट वेगाने वाढत असून याचा परिणाम सीमावर्ती भागात दिसून येत आहे.
कर्नाटक सरकारने योग्य वेळी पूर्वखबरदारी घेतली असली तरी कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढण्याच्या स्थितीत दिसून येत आहे. महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे सीमावर्ती भागात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेऊन, संपूर्ण तपासणी करूनच कर्नाटकात प्रवेश देण्यासंबंधी आदेश जारी करण्यात आले आहेत. आरोग्य तपासणी चेकपोस्टवर काटेकोर पद्धतीने करण्यात येत आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता यापूर्वीच कोविड तांत्रिक सल्लागार समितीने वर्तविली होती. सध्या अनेक ठिकाणी पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून सर्व खबरदारी बाळगून, मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन आरोग्य खाते आणि सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.