आगामी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा सज्ज झाली असून पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांची परेड घेण्यात येत आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने काळ्या यादीतील गुन्हेगारांची परेड घेऊन त्यांना तंबी देण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार रविवारी सायंकाळी खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसल्याही प्रकारचा उपद्रव कराल तर याद राखा. आता केवळ राऊडी शीटमध्ये तुमची नांवे आहेत. तुमच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्या तर कायद्याचा हिसका दाखवावा लागेल, अशा शब्दात गुन्हेगारांना तंबी दिली.
सदर परेडप्रसंगी खडेबाजार पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील 30 हून अधिक गुन्हेगारांनी हजेरी लावली होती. सध्या तुम्ही जे काम करीत आहात. त्याच कामात स्वतःला गुंतवून ठेवा. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी कारवायामध्ये पुन्हा भाग घेऊ नका. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिस दलाला तुमच्यावर कारवाई करावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाला बॉंड द्यावा लागणार आहे, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी काळ्या यादीतील गुन्हेगारांना बजावले आहे.