महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आणि सीमासमन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १०० रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सीमाभागासाठीही एक हायटेक आणि कार्डियाक सुविधा असणारी रुग्णवाहिका सीमावासियांच्या सेवेत दाखल झाली आहे.
नगरविकास मंत्री आणि सीमासमन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात १०० रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा ठाणे, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.
या १०० रुग्णवाहिकांपैकी १ रुग्णवाहिका बेळगावच्या जनतेसाठी देण्यात आली आहे. सीमाभागातील जनतेची आपत्कालीन परिस्थितीत सोय व्हावी यासाठी बेळगाव शिवसेना शाखेकडे हि रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली आहे. समस्त सीमावासीयांसाठी हि रुग्णवाहिका वरदान ठरणारी आहे.
सदर रुग्णवाहिका हायटेक तंत्रज्ञानाला अनुसरून बनविण्यात आली असून या रुग्णवाहिकेमध्ये कार्डियाक सुविधादेखील आहे. सदर रुग्णवाहिका एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
ठाण्यामध्ये झालेल्या या लोकार्पण सोहळ्यात बेळगाव शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संघटक दत्ता जाधव,सचिन गोरले, प्रवीण तेजम आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते रुग्णवाहिकेची चावी सुपूर्द करण्यात आली.