अलमट्टी जलाशयाची पातळी वाढावी यासाठी तसेच या जलाशयाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेतप्रसंगी बोलताना जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले की, अलमट्टी जलाशयाची वाढावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. या जलाशयात आणखी जादा पाणी साठा झाला तर त्याचा फायदा संपूर्ण उत्तर कर्नाटकाला होईल. याव्यतिरिक्त उत्तर कर्नाटकाला अभिमानास्पद असे जे काम केले जाणार आहे ते म्हणजे अलमट्टी जलाशयाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
त्यासाठीच मी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आदींची भेट घेतली होती. या जलाशयाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळाल्यास केंद्र व राज्य सरकारकडून अतिरिक्त निधी मिळणार आहे. ज्यामुळे कर्नाटकचा विकास होऊन जलसंपदा खाते देखील अधिक बळकट होणार आहे. अलमट्टी जलाशय राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाल्यास केंद्र सरकारकडून 60 टक्के आणि राज्य सरकारकडून 40 टक्के निधीची अर्थसंकल्पात तरतूद होईल, असे जारकीहोळी यांनी सांगितले.
गोकाकच्या सुप्रसिद्ध धबधब्याच्या ठिकाणी असलेल्या झुलत्या पुलाच्या जागी ग्लास ब्रिज होणार आहे. या ब्रिजसाठीच्या तरतुदीची आगामी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली जाईल. त्याचप्रमाणे बेळगाव ते सांबरा मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी शेकडो कोटी मंजूर करून घेण्याचे प्रयत्न देखील सुरू असल्याचे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके यांनी फक्त बेळगाव ते बसवन कुडची दरम्यानच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार असून आगामी अर्थ संकल्पात याची तरतूद होईल यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेस मंत्री उमेश कत्ती, आमदार अनिल बेनके महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.