बहुसंख्य मराठी नाटकांमधील स्त्री प्रतिमांचे चित्रण पुरुषाने केलेले आहे. त्यामुळे बऱ्याचदा स्त्रिया अबला पराभूत अशाच दिसतात. हे चित्र बदलायचे असल्यास स्त्रियांनी जोमाने नाट्यलेखन करणे आवश्यक आहे, असे मत डॉ. सध्या देशपांडे यांनी व्यक्त केले.
मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी आयोजित 34 व्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहाच्या आशा मनोहर साहित्य नगरीतील डॉ. सरोजनी बाबर व्यासपीठावर हे महिला साहित्य संमेलन आज रविवारी सायंकाळी उस्फूर्त प्रतिसाद पार पडले. अध्यक्षीय भाषणात डॉ. संध्या देशपांडे यांनी गेल्या 40 वर्षातील स्त्रीकेंद्रित नाटकांचा विस्तृत परामर्श घेतला.
सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली मुलींची शाळा, महर्षी कर्वे यांनी सुरू केलेले महिला विद्यापीठ आणि 1929 साली झालेली अखिल भारतीय महिला परिषद या घटनांचा स्त्री जीवनावर खोल परिणाम झाला. 1960 पर्यंत स्त्रियांची परिस्थिती म्हणावी इतकी चांगली नव्हती. बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले आणि महिला नोकरी करू लागल्याने त्यांना आर्थिक स्थैर्य आले.
1980 नंतर नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढली. 1843 मध्ये सिता स्वयंवर हे नाटक आले. त्या नाटकापासून पुढील अनेक नाटकांमध्ये अबला पराभूत अशीच रंगवली गेली. त्यानंतर मात्र चित्र पालटले, सर्व जीवन मूल्ये बदलली. त्याचबरोबर ताण निर्माण झाले. मुकाट सर्वकांही सोसणाऱ्या स्त्रियांचे चित्र बदलून आपले स्वत्व -स्वाभिमान यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या स्त्रिया पुढे आल्या. त्याचेही चित्रण नाटकांमध्ये झाले, परंतु नाटकांमधील चित्रण हे बहुसंख्य पुरुषांनीच केलेले आहे. जेंव्हा स्त्रिया अधिक लिहित्या होतील, तेंव्हा वेगळ्या पद्धतीने स्त्री चित्रण पुढे येईल, असा आशावादही डॉ. संध्या देशपांडे यांनी व्यक्त केला.
प्रारंभी ईशस्तवन व स्वागतगीत झाल्यानंतर “मंथन” च्या अध्यक्षा शोभा लोकूर यांनी स्वागत केले. मनीषा नाडगौडा यांनी परिचय करून दिल्यानंतर शोभा लोकूर यांच्या हस्ते डॉ. संध्या देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. विजेत्यांची नांवे सावित्री कळ्ळीमनी यांनी वाचली. मीना जठार यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्षीय भाषणानंतर प्रिया कवठेकर यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्रात पत्रकार मनीषा सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली स्मरणगाथा हे दुसरे सत्र झाले. यामध्ये साधना आमटे यांच्या “समिधा” आत्मचरित्रावर शीतल बडमंजी आणि सई परांजपे यांच्या “सय” या आत्मचरित्रावर आरती आपटे यांनी विवेचन केले. मनीषा सुभेदार यांनी अध्यक्षीय समारोप केला.
आपल्या भाषणात त्यांनी एकूणच महिला आत्मचरित्राचा धांडोळा घेऊन आजच्या काळाशी सुसंगत असे त्यातील नेमके कोणते विचार आपण घ्यायला हवेत हे स्पष्ट केले. तिसऱ्या सत्रात दक्षता अधिकारी लोणकर यांनी कथाकथन केले. सूत्रसंचालन अपर्णा देशपांडे यांनी केले. वंदे मातरम् रजनी गुर्जर यांनी सादर केले. संमेलनास बहुसंख्य महिला आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.