गेल्या चार दिवसापासून बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे लाल-पिवळा हटविण्यासंदर्भात आणि भगवा ध्वज महानगरपालिकेसमोर फडकविण्यासंदर्भात बैठक सुरु आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका होत असून या बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा वा सकारात्मक चर्चा जिल्हा प्रशासनाकडून होत नाही.
गुरुवार दिनांक २१ रोजी ठरविण्यात आलेला महामोर्चा बैठकीनंतर तुम्ही ठरवा, त्याआधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करा, अशी विनंती काल डीसीपी विक्रम आमटेंनी केली आणि मोर्चा स्थगित झाला. परंतु आज जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने, प्रशासन वेळकाढूपणा करत असून या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले.
या बैठकीदरम्यान महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके हे बैठकीतून अचानक उठून बाहेर निघाले. दरम्यान मराठी भाषिकांची होत असलेली सेहोलपट याचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. तो ध्वज त्वरित हटवा अन्यथा त्याचठिकाणी भगवा ध्वज लावण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मराठी भाषिकांची गळचेपी करणाऱ्या प्रशासनाने लाल-पिवळ्या ध्वजाच्या मुद्द्यावरून चालढकल सुरू केली आहे. याचा युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी निषेध केला. त्यानंतर ते बैठकीतून बाहेर पडले. शुभम शेळके यांनी आज घेतलेल्या भूमिकेचे सीमाभागातील मराठी भाषिकातून स्वागत होत आहे. तसेच अशाच पद्धतीने मराठी जनतेसाठी निर्धार करणाऱ्या नेत्याची गरज असल्याचेही बोलले जात आहे.
समिती नेतृत्व जिल्हा प्रशासनाशी चर्चा करताना कमी पडू लागले की काय? अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली असून कणखर ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
आजतागायत प्रशासन मराठी भाषिकांवर या ना त्या कारणाने दडपशाही करत आले आहे. प्रशासनाला रोखठोख भाषेत जाब विचारून आपला मुद्दा ठामपणे मांडणाऱ्या शुभम शेळके यांचे सीमाभागातून अभिनंदन होत आहे.