१६ डिसेंबर रोजी यमकनमर्डी येथे भरमा भूपाळ धुपदाळ (रा. हत्तरगी) यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी शुक्रवारी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. युवराज सूर्याजी (उर्फ सुरेश नाईक) (रा.मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताकडून तीन गावठी पिस्तूल, चार मॅगझीन, दोन जीवनात काडतुसे जप्त केली आहेत. यापूर्वी विनायक सोमशेखर होरगेरे (वय २६, रा. गणपत गल्ली, यमकनमर्डी) याला अटक केली होती. याप्रकरणातील अटकेतील संशयितांची संख्या दोनवर पोहोचली आहे.
भरमा भूपाळ धुपदाळ हे कट्ट्यावर चर्चा करत बसले होते. यादरम्यान तोंडावर मंकी कॅप घालून आलेल्या अनोळखीने त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडून पलायन केले होते. याप्रकरणी यमकनमर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आठवडाभरापूर्वी विनायक या पहिल्या संशयिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने भरमा भूपाळ धुपदाळ यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली. विनायक तरुणीवर प्रेम करत होता. तिचे भरमा हे नातेवाईक लागतात. यामुळे त्यांनी विनायकाच्या प्रेयसीचा दुसरीकडे साखरपुडा करून दिला होता.
प्रेमप्रकरणात अडथळा ठरणाऱ्या भरमा यांचा कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने विनायकने भरमा भूपाळ धुपदाळ यांच्यावर गोळीबार केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी दुसरा संशयित फरारी होता. अखेर शुक्रवारी युवराज या दुसऱ्या संशयिताला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी कारागृहात केली. याप्रकरणी उपनिरीक्षक सुनील पाटील पुढील तपास करीत आहेत.