बेळगावला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. बेळगाव नजीकच्या डोंगर -घाटात ज्ञात-अज्ञात अनेक लहान-मोठे धबधबे आहेत. मात्र अलीकडे पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या अस्वच्छतेमुळे ही निसर्ग रम्य स्थळं कचराकुंड बनवू लागली आहेत.
बेळगावनजीकच्या पश्चिम घाटामध्ये असंख्य लहान-मोठे धबधबे आहेत. परंतु भविष्यासाठी निसर्गरम्य परिसरातील या धबधब्यांचे आपण जतन केले पाहिजे असे कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाला धबधब्याच्या ठिकाणी जाऊन मजा करायची आहे, कचरा करायचा आहे आणि निघून जायचे आहे, बस्स. या व्यतिरिक्त कोणीही जास्त विचार करत नाही.
गोव्याच्या सीमेवरील सुरल येथील जलवानी धबधबा पहा. हा धबधबा कोरोना प्रादुर्भावाचे संकट निवळेपर्यंत कोणालाही माहित नव्हता. मात्र या धबधब्याच्या स्फटिका समान अत्यंत पारदर्शी निळ्या पाण्याच्या काठाशी आता प्लास्टिक बाटल्यांचा खच साचलेला दिसून येतो. खरंतर गेल्या अनेक दशकांपासून जलवानी धबधब्याचे सौंदर्य हा निसर्गाचा एक अस्पर्श ठेवा होता. कांही मोजक्याच ट्रेकर मंडळींना या धबधब्याचे ठिकाण माहीत होते परंतु यावर्षी या ठिकाणाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सुरल नजीकच्या या धबधब्याला जणू कचरा कुंडाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे पाहता धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येकाला आपण आपला निसर्ग सुरक्षित ठेवत नाही याची खरंतर लाज वाटली पाहिजे. ज्यांनी या धबधब्याला भेट दिली आहे त्यांनी आपण धबधब्याच्या ठिकाणी काय ठेवून आलो याचे सिंहावलोकन करावे.
गोवा सरकारने या पद्धतीने निसर्गरम्य स्थळांच्या ठिकाणी व स्वच्छता निर्माण होणार नाही यासाठी तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.
किमान साधा उपाय म्हणजे या ठिकाणी कचरा आणि रिकाम्या बाटल्या धबधब्यात टाकू नये हा फलक उभारला जावा. पर्यटक धबधब्यात प्लास्टिक व कागदाच्या पिशव्या केरकचरा दारूच्या रिकाम्या बाटल्या धबधब्यात फेकतात बऱ्याचदा या फुटलेल्या बाटल्यांच्या कांचा पाणी पिण्यास येणाऱ्या जनावरांच्या खुरांना तसेच आसपासच्या ग्रामस्थांना दुखापती देतात. याची गांभीर्याने दखल घेऊन सदर गैरप्रकारांना तात्काळ आळा घालण्याची आणि पर्यटकांनीही याबाबतीत सज्ञान होण्याची गरज निर्माण झाली आहे.