वरेरकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये आयोजित बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य आणि होतकरू चित्रकार हेमंतकुमार टोपीवाले यांच्या जलरंगातील चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी उत्साहात पार पडले.
टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघातर्फे आयोजित या चित्र प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ दै तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक कोल्हापूरचे चित्रकार तसेच चित्रपट व नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्यासह राजेशकुमार मौर्य, त्यांचे गुरु सी. एस. पंत, हेमंतकुमार टोपीवाले व नम्रता राजेशकुमार मौर्य उपस्थित होते. चंद्रकांत जोशी यांच्या हस्ते झाडाच्या रोपाला पाणी घालून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
बाकीच्या कला बाहेरून आत येतात मात्र चित्रकलाही आतून बाहेर येते. देव आपल्याला डोळे देतो, तर गुरु दृष्टी देतो. या दृष्टीमुळेच कलाकाराला निसर्ग वेगळा दिसतो आणि चित्रकार आपल्या कलाकृतीतून त्याचे प्रत्ययकारी दर्शन घडवितो, असे विचार चंद्रकांत जोशी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले. राजेशकुमार आणि हेमंतकुमार या दोन्ही कलाकारांनी जलरंगातील आपल्या करामती येथे प्रदर्शित केल्या आहेत. त्यांना मी शुभेच्छा देतो, असेही जोशी म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात किरण ठाकुर यांनी नव्या उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ही आर्ट गॅलरी सुरू केली आहे असे सांगून त्याचा सदुपयोग सर्वांनी करून घ्यावा, असे आवाहन केले यावेळी सी. एस. पंत यांनीही आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. राजेशकुमार मौर्य यांनी कलाकारांच्यावतीने सर्वांचे आभार मानले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन जगदीश कुंटे यांनी केले. याप्रसंगी स्थानिक चित्रकारांसह कलाप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. या जलरंग चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने कलाप्रेमींना नम्रता राजेशकुमार मौर्य यांच्या फॅशन फोटोग्राफीची झलक देखील पहावयास मिळणार आहे. सदर प्रदर्शन येत्या 19 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.