वाटाळ नागराज हे कर्नाटकातील असे व्यक्तिमत्व आहे, जे केवळ प्रसिद्धीसाठी झगडत असते. नेहमीच निरर्थक आणि वाचाळ वक्तव्यांनी भरलेले हे व्यक्तिमत्व कधी, कुठे आणि कोणती वटवट करेल याचा नेम नाही. कधी सरकारी यंत्रणेच्या विरोधात, कधी सरकारी निर्णयाविरोधात तर कधी मराठी भाषिकांविरोधात.. सातत्याने नवनवी वक्तव्ये करून केवळ प्रसारमाध्यमांवर झळकण्याची लक्ष वळविण्यासाठी आटापिटा करणाऱ्या वाटाळ नागराजने आता मराठा विकास महामंडळाच्या विरोधात टीवटीव सुरु केली आहे.
बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटक राज्यात मराठा विकास महामंडळ स्थापन केल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समिती सक्रिय झाली आहे. येत्या 21 फेब्रुवारी रोजी लाखो कन्नड कार्यकर्ते बेळगावमध्ये येतील आणि बेळगावमध्ये लावण्यात आलेले सर्व मराठी फलक काढून टाकतील, अशी पोकळ वल्गना वाटाळ नागराजने केली आहे. याचपद्धतीने सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील गावात आंदोलन करण्याचीही घोषणा केली आहे.
मराठा विकास महामंडळ रद्द करणे यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाविरोधात येथील रेल्वे स्थानकावर आज रेल रोको आंदोलन वाटाळ नागराज आणि त्याच्या समर्थकांनी छेडले. प्रसारमाध्यमांव्यतिरिक्त या आंदोलनाकडे कुणीही फिरकले नाही हे विशेष. याउलट पोलिसांना वाटाळ नागराजसह त्याच्या समर्थकांना अटक करण्यासाठी अतिरिक्त कष्ट सोसावे लागले.
वाटाळ नागराज आणि त्याचे तथाकथित कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर दाखल झाले. परंतु रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेल्या बंदोबस्तावरील पोलिसांनी त्या सर्वांना अटक केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई येथे दोन दिवसांपूर्वी बेळगावातील मराठी संस्कृतीविषयी पुरावे सादर केले होते. त्याचा उल्लेख देखील वाटाळ नागराजने केला. पण, पुरावे खरे आहेत की खोटे, याची शहानिशा करण्याची मागणी मात्र त्याने केली नाही.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून 50 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ सादर करण्यात आला. हे असे प्रकार केवळ राजकीय लाभासाठी करण्यात येत असून याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात तीव्र आंदोलन करण्याची पोकळ वल्गना देखील त्याने केली आहे.