माळअंकले (ता. खानापूर) येथील निवृत्त मुख्याध्यापक व प्रगतशील शेतकरी परशराम गुंडू कुलम यांच्या गाईने बुधवारी तीन वासरांना जन्म दिला असून हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
आजपर्यंत गाईने जास्तीत जास्त दोन वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र तीन वासरांना जन्म देण्याची ही खानापूर तालुक्यातील पहिलीच घटना असावी अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.
या प्रकाराबद्दल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. परशुराम कुलम हे निवृत्त शिक्षक असले तरी त्यांना जनावरे पाळण्याची आवड आहे.
या आवडीपोटी त्यांनी पाळलेल्या गाईने तीन वासरांना जन्म दिला आहे. सध्या गाई बरोबरच तीनही वासरे सुखरूप असून वासरांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे.