१ जानेवारीपासून शाळा सुरु झाल्यानंतर शाळा परिसर गजबजू लागले आहेत. परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती म्हणावी तितकी जाणवत नाही. शुक्रवारी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश बजावले होते.
यानुसार गुरुवारी रीतसर शाळा आणि महाविद्यालयातील वर्गखोल्यांची स्वच्छता करून तसेच कोरोना नियमांचे पालन करून वर्ग सुरु करण्यात आले. शुक्रवारपेक्षा शनिवारी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक जाणवली.
शनिवारी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी, अनुदानित व विनानुदानित शाळांमध्ये सातवीचे ५२.०२ टक्के विद्यार्थी शाळेत हजर होते. मात्र ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ ३८ टक्के इतकी होती. तर सौंदत्ती तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती.
पहिले दोन दिवस शाळेत विद्यार्थ्यांची हजेरी कमी होती. मात्र सोमवारपासून शालेय विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून पालकांनी कोणतीही भीती न बाळगता विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी व्यक्त केले आहे.