राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूक सुरळीत पार पडल्या. नुकतेच या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. अनेकांनी आपला विजयोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला.
परंतु काळाची गरज ओळखून, परिवर्तनाकडे वाटचाल करणाऱ्या अनेकांची संख्या आता वाढत चालली आहे. कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत सदस्यपदी निवडणूक आलेले नवनिर्वाचित सदस्य वैजनाथ बेन्नाळकर यांनी आपला विजयोत्सव आदर्श पद्धतीने साजरा केला आहे.
कंग्राळी ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक ४ मधून निवडणूक लढवून बहुमतांनी निवडून आलेले वैजनाथ बेन्नाळकर यांनी मौज मजा, आतिषबाजी आणि इतर गोष्टीवर वायफळ खर्च न करता आपला विजयोत्सव बेळगाव मधील ‘मक्कळ धाम’ या एचआयव्हीग्रस्त मुलांच्या अनाथाश्रमात साजरा केला.
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होताच अनेक विजयी उमेदवारांनी लाखो रुपयांची उधळपट्टी करत आचारसंहिता असूनही विजयोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. काही ठिकाणी रात्रभर डॉल्बीसहित मिरवणुकीचे प्रकारही झाले.
कोरोना पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी न बाळगता बेफामपणे गर्दी करून अनेकांनी आपला विजयोत्सव साजरा केला. परंतु ‘लोकप्रतिनिधी’ या पदवीचा खऱ्या अर्थाने बोध घेऊन या शब्दाचा खरा अर्थ जनसामान्यात पोहोचविण्याचे काम सुरुवातीलाच वैजनाथ बेन्नाळकर यांनी केले आहे.
वैजनाथ दादा बेन्नाळकर यांनी ‘मक्कळ धाम’ आश्रमातील मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे, तसेच कोरोनापासून बचाव करणाऱ्या वस्तूंचे वितरण करून मिठाई वाटून आपला विजयोत्सव आणि आनंदोत्सव साजरा केला.
‘फर्स्ट इम्प्रेशन इस द लास्ट इम्प्रेशन’ या प्रमाणे ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्यानंतर वैजनाथ बेन्नाळकर यांनी समाजासमोर आणि युवा उमेदवारांसमोर एक अनोखा आदर्श मांडला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे अनेक स्तरावर कौतुक होत आहे.